शिरूर बसस्थानकातील चोरीचा गुन्हा उघडकीस; दोन महिलांना अटक, 4.68 लाखांचे दागिने जप्त

शिरूर : शिरूर बसस्थानकात ११ मे रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास झालेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी दोन महिला आरोपींना अटक करून ४ लाख ६८ हजार रुपये किंमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
रूपाली अनिल काळेल (रा. त्रिमूर्तीनगर, भिगवण रोड, जळोची, बारामती) यांनी त्यांची मुलगी तन्वी आणि भाची साक्षी यांच्यासह बारामतीला जाण्यासाठी शिरूर बसस्थानकातून एसटी बस (क्रमांक MH 14 BT 4193) मध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने ६.५ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण आणि १.३ तोळे वजनाचे सोन्याचे झुबे असा एकूण ४.६८ लाखांचा ऐवज चोरला असल्याची फिर्याद दिली. याप्रकरणी शिरूर पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी मनिषा विजय कसबे आणि शोभा शंकर दामोदर (रा. संजयनगर, श्रीरामपूर, जि. अहमदनगर) यांना श्रीरामपूर येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरीचे सर्व दागिने जप्त केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण पथकाचे पोलीस हवालदार तुषार पंधारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजु मोमीन व शिरूर पोलीस स्टेशन तपास पथकाचे उपनिरीक्षक शुभम चव्हाण, दिलीप पवार, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, महीला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, महीला पोलीस अंमलदार मोनिका वाघमारे, पोलीस अमंलदार नितेश थोरात, विजय शिंदे, रविंद्र आव्हाड, अजय पाटील, सचिन भोई, निखील रावडे, निरज पिसाळ यांचे पोलीस पथकाने केली.





