Baramati: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; 51 हजारांचा मुद्देमाल लंपास
Baramati: चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर

बारामती : शहरातील फलटण रोड परिसरातील मिश्रीलाल डिस्ट्रीब्युटर्स टायर दुकानात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून तब्बल आठ टायर चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या चोरीत सुमारे 51 हजार 414 रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे.
याप्रकरणी टायर विक्रीचा व्यवसाय करणारे तेजस मनोज मुथा (वय 35) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 305(अ) व 331(4) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीच्या माहितीनुसार, 3 ऑक्टोबर रोजी रात्री साडेसात वाजल्यापासून 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंतच्या कालावधीत चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील ब्रिजस्टोन कंपनीचे 195/60R16 आकाराचे चार टायर तसेच 165/70R14 आकाराचे चार टायर, असा एकूण आठ टायरचा मुद्देमाल चोरीला गेला.
चोरीस गेलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 51 हजार 414 रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. धन्यादेवो विष्णू क्षीरसागर यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे.
सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक माहितीच्या आधारे चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.





