वडगाव मावळ – शिरोता वन विभागाच्या हद्दीतील साई गावातील वनक्षेत्रात कुत्र्यांच्या हल्ल्यातून वाचवून एका भेकराच्या पिलाला आदिवासी तरूणांनी जीवदान दिले. एका वन्यप्राण्याचा जीव वाचवल्याबद्दल प्राणदात्या नागरिकांचे सर्वजण कौतुक करत आहेत.
बुधवारी (दि.13) सकाळच्या सुमारास भेकर मादी व तिच्या पिल्लावर काही कुत्र्यांनी हल्ला केला. कुत्र्यांच्या हल्ल्यात मादी जंगलाच्या दिशेने पळून गेली तर भांबावलेले एक पिल्लू एका दगडाच्या आडोशाला लपून बसले. रानभाजी आणण्यासाठी गेलेल्या नवनाथ हिलम व रोहिदास हिलम ह्या आदिवासी तरुणांनी हे पिल्लू पाहिले. पिल्लू खूप लहान असल्याने एकटे त्यास जंगलात सोडून देणे धोकादायक होते. त्यामुळे या तरुणांनी त्याला घरी आणून वन्यजीवरक्षक संस्थेचे सदस्य सचिन वाडेकर व उमेश धुमाळ यांना या पिलाबाबत माहिती दिली. त्यानंतर वन्यजीवरक्षक टीमच्या सदस्यांनी याबाबत माहिती वनविभागाला दिली.
आपल्या आई पासून हरवून रस्ता चुकूलेले ते भेकराचे पिल्लू वनविभाग व वन्यजीव रक्षक संस्था मावळ यांनी संयुक्तपणे रेस्क्यू केले. वडगाव येथील वनविभागाच्या कार्यालयात त्या पिल्लाची तपासणी करून त्यास पुढे पुणे येथील रेस्क्यू चारिटेबल संस्थेत पाठवले आहे. भेकराचे पिल्लू एकदम ठणठणीत असून लवकरच त्यास त्याच्या अधिवासात सोडण्यात येईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील मंतावर यांनी सांगितले.