राजगड तालुक्यातील शिवकालीन पांदण रस्त्यांच्या मोजणीचे काम अंतिम टप्प्यात

राजगड : राजगड तालुक्यातील शिवकालीन पांदण, गाडी वहिवाट आणि शेत रस्त्यांची सरकारी नकाशात नोंद करण्यासाठी भुमि अभिलेख विभागामार्फत सुरू असलेले मोजणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आतापर्यंत राजगड, तोरणा, पानशेत परिसरासह तालुक्यातील ३४५ रस्त्यांची मोजणी पूर्ण झाली असून त्यांच्या हद्दी निश्चित करण्यात आल्या आहेत.
राजगड तालुका तहसीलदार निवास ढाणे यांच्या देखरेखीखाली महसूल सेवा पंधरावड्या अंतर्गत आयोजित शिवार फेरी अभियानात गावांतील सर्व शेत, वहिवाट आणि पांदण रस्त्यांची मोजणी करून त्यांच्या हद्दी निश्चित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. लवकरच या रस्त्यांची नोंद महसूल दफ्तरात होऊन त्यांना सरकारी क्रमांक देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार निवास ढाणे यांनी दिली. पानशेतजवळील निगडे मोसे येथे ग्राम महसूल अधिकारी हेमंत घोडके आणि भुमि अभिलेख विभागाचे भुमापक पंकज शिंदे यांनी गावातील पांदण आणि वहिवाट रस्त्यांची पाहणी करून मोजणी केली.
माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी सांगितले की, गावातील सर्व पांदण आणि वहिवाट रस्त्यांच्या हद्दी निश्चित होऊन त्यांची कायदेशीर अभिलेखात नोंद होणार आहे. यामुळे रस्त्यांना सरकारी क्रमांक मिळणार असून, शेतकरी आणि रहिवाशांची गैरसोय दूर होईल. तसेच, गावच्या विकासाला चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले. यावेळी रामदास नलावडे, बबन नलावडे, जनार्दन नलावडे, सुभाष नलावडे, काळुराम नलावडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.





