“माथाडी कामगार’ हा शब्दच बदनाम झालाय – इरफान सय्यद

पिंपरी – शासनाने 1969 मध्ये माथाडी कामगार कायदा केला. मात्र काही चुकीच्या लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी संघटना काढल्या आहेत. त्या लोकांमुळे माथाडी कामगार हा शब्द बदनाम झाला आहे, अशी खंत महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इरफान सय्यद यांनी व्यक्त केली.
दै. “प्रभात’मधील गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर ते बोलत होते. यावेळी बोलताना इरफान सय्यद म्हणाले, असंघटीत कामगारांसाठी शासनाने माथाडी कायदा केला. ज्या कंपन्या या कायद्याचे पालन करतात. त्यांना कोणताही त्रास होत नाही. कायदा न पाळणाऱ्या मात्र त्रास होत असतो. अनेकदा काही व्यावसायिक माथाडींच्या विरोधात बोलतात. मात्र त्यांनी माथाडी कामगार कायद्याची माहिती करून घेतल्यास त्यांना भविष्यात कोणताही त्रास होणार नाही. माथाडी हा कायदा असंघटित कामगारांसाठी असला तरी बांधकाम कामगारांना हा कायदा लागू होत नाही. कारण जर बांधकाम कामगाराची नोंदणी माथाडी बोर्डात केली तर तीन चार वर्षानंतर बांधकाम साइट पूर्ण झाल्यावर हे कामगार बेरोजगार राहतील.
संयुक्त बैठकीचे आयोजन करावे
बांधकाम कामगारांच्या प्रश्नांबाबत बांधकाम व्यवसायिक असोशिएशन, क्रेडाई, माथाडी कामगार बोर्ड यांची संयुक्त बैठक बोलवावी. या बैठकीत बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडविता येईल. काम करीत असताना एखादा अपघात घडल्यास त्या कामगाराला कायदेशीर रित्या मदत मिळू शकेल. तसेच इतर संघटनांच्या दादागिरीलाही चाप बसेल, असा विश्वास कामगार नेते इरफान सय्यद यांनी व्यक्त केला.





