पिंपरी | धोकादायक मंडईच्या इमारत नूतनीकरणाचा मार्ग खुला

खालापूर, (वार्ताहर) – खोपोली नगरपालिकेच्या महात्मा फुले भाजी मंडईची इमारत धोकादायक झाली आहे. पालिका प्रशासनाने २५ जून २०१५ रोजी व्यापाऱ्यांना स्थलांतरित होण्याच्या लेखी सूचना दिल्या होत्या.
मात्र, स्थलांतरित होण्यासंदर्भात व्यापाऱ्यांच्या काही अटी व शर्ती होत्या. त्यावर निर्णय होत नसल्याने नऊ वर्षांपासून भाजी मंडईच्या नूतनीकरणचे काम रखडलेले होते. अखेर सदरची इमारत पडण्याच्या स्थितीत असल्याने न्यायालयाकडून मंडई विकास कामाबद्दल आलेल्या सकारात्मक निर्णयामुळे अखेर भाजी मंडईच्या धोकादायक इमारत पाडण्याचे काम सुरू झाले आहे.
गतवर्षी 2022 – 23 मध्ये पावसाळ्यापूर्वी नगरपालिकेकडून व्यापाऱ्यांना व गाळे धारकांना इमारत धोकादायक असल्याच्या पुन्हा नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. तसेच इमारत खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याविरोधात व्यापारी न्यायालयात गेले होते. न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली होती.
त्यामुळे भाजी मंडईच्या कामाला ब्रेक लागला होता. दरम्यान, इमारतीची अवस्था दिवसेंदिवस जीर्ण होत असल्याने या वर्षी मंडईच्या विकासावर व्यापारी वर्ग, कायदेशीर व प्रशासकीय स्तरावर एकमत झाले. आता भाजी मंडईचा विकास गतवर्षी प्रसिद्ध झालेल्या निविदेनुसार होणार की, यात काही बदल होणार याकडे व्यापारी व शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
व्यापाऱयांची सकारात्मक भूमिका
धोकादायक बनलेल्या इमारतीचे काम १९७८ च्या आसपास करण्यात आले आहे. बांधकाम जीर्ण झाल्याने इमारतीचा मोठा भाग धोकादायक स्थितीत होता. दरम्यान ३५ ते ४० वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना पालिकेच्या अटीशर्तीमुळे भविष्यात आपला व्यवसाय धोक्यात येवू शकतो, अशी भीती वाटत होती.
त्यामुळे ते गाळे स्थलांतरास विरोध दर्शवत होते. अखेर व्यापाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने भाजी मंडईच्या इमारत नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
महात्मा फुले भाजी मार्केटची इमारत धोकादायक असल्याचे गतवर्षीच जाहीर करण्यात आले होते. दरम्यान, काही अडचणींमुळे इमारत खाली करण्यात आली नव्हती व नूतनीकरणाचे कामही रखडले होते.
मात्र, व्यापारी व भाजी मंडईत येणाऱ्या नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने या संदर्भात चर्चेतून व तसेच कायदेशीर मार्गाने सकारात्मक बाबी समोर आल्या असून त्यावर सर्वांचे एकमत झाले आहे.
– डॉ. पंकज पाटील, मुख्याधिकारी तथा प्रशासक, खोपोली नगरपालिका.





