Hingoli News : रणरागिनी एकवटल्या! पानकनेरगावात महिलांचा दारूबंदीचा एल्गार
Hingoli News : गावात दारूबंदी लागू करायची का?” असा प्रश्न उपस्थित होताच संपूर्ण परिसर होय होयच्या घोषणांनी दणाणून गेला आणि ठराव एकमुखी मंजूर करण्यात आला.

हिंगोली : आमचे नवरे दारूमुळे घर उद्ध्वस्त करत आहेत मुलांचे भविष्य अंधारात जात आहे… आता तरी गाव वाचवा!” या आक्रोशाने शनिवारी पानकनेरगावातील महिला ग्रामसभा अक्षरशः हादरून गेली.
महिलांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत असतानाच गावात संपूर्ण दारूबंदी लागू करण्याचा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला. सेनगाव पोलीस स्टेशन हद्दीतील पानकनेरगाव येथे दि. २ मे २०२६ रोजी हणुमान मंदिर परिसरात विशेष महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सौ. अर्चना चंद्रशेखर देशमुख या होत्या. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या सभेत महिलांनी दारूविरोधात तीव्र संताप व्यक्त करत गावात वैध आणि अवैध दारूविक्री पूर्णपणे बंद करण्याची जोरदार मागणी केली.
यापूर्वी दि. २३ एप्रिल रोजी महिलांनी ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज सादर करून दारूबंदीची मागणी केली होती. त्यानुसार आयोजित ग्रामसभेत ग्रामविकास अधिकाऱ्यांनी महिलांच्या मागणीचे वाचन केले. गावात दारूबंदी लागू करायची का?” असा प्रश्न उपस्थित होताच संपूर्ण परिसर होय होयच्या घोषणांनी दणाणून गेला आणि ठराव एकमुखी मंजूर करण्यात आला.
दारूने घरे मोडली, संसार रस्त्यावर आले” ग्रामसभेत अनेक महिलांनी आपल्या संसाराची व्यथा मांडताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. दारूमुळे घरात रोज भांडणे होतात”, “मुलांच्या शिक्षणासाठी पैसे राहत नाहीत”, “कमाई दारूत उडते”, “महिलांवर अत्याचार वाढले” अशा संतप्त भावना महिलांनी व्यक्त केल्या. काही महिलांना बोलतानाच हुंदके आवरले नाहीत.
गाव धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेसाठी ओळखले जात असतानाही गेल्या काही वर्षांत गावात वाढलेल्या दारूविक्रीमुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याचा आरोप महिलांनी केला. “मानकेश्वर बाबांच्या पवित्र भूमीत दारूचा विळखा नको,” अशी भावनिक हाकही यावेळी देण्यात आली.
“दारूबंदी नाही झाली तर रस्त्यावर उतरू”महिलांनी प्रशासनालाही थेट इशारा दिला. “ठराव करूनही कारवाई झाली नाही, तर आम्ही आंदोलन करू, रस्त्यावर उतरू,” असा निर्धार महिलांनी व्यक्त केला. गावातील तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत चालल्याबद्दलही गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली.
ग्रामसभेत मंजूर झालेल्या दारूबंदी ठरावाची प्रत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला पाठविण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली. पानकनेरगावातील महिलांनी उभारलेला हा दारूबंदीचा एल्गार आता प्रशासन कितपत गांभीर्याने घेतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.





