प्रतिक्षा संपली! अखेर दहावीच्या निकालाची तारीख जाहीर

Maharashtra SSC Result 2024 Date| महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल येत्या सोमवारी (दि.२७) दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना निकालाबाबत उत्सुकता लागलेली आहे.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी येत्या २७ मे पर्यंत इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार राज्य मंडळाने २७ मे रोजी निकाल जाहीर करण्याबाबतचे परिपत्रक प्रसिध्द केले आहे. यंदा प्रथमच मे महिन्यातच दहावीचा निकाल जाहीर होत आहे.
यापूर्वी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा जुलैमध्ये निकाल जाहीर करण्याची परंपरा होती. यंदा विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे बंधन घालण्यात आल्यामुळेच निकाल लवकर जाहीर होत आहे.
पुणे, नागपुर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत १ ते २६ मार्च २०२४ या कालावधीत परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी सुमारे १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण संकेतस्थळावरून उपलब्ध होतील व या माहितीच्या प्रतीची प्रिंट आऊटही घेता येणार आहे. https://mahresult.nic.in या संकेतस्तळावरुन विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांखिकी माहिती उपलब्ध होणार आहे. https:// mahahsscboard in या सकतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होणार आहे.
ऑनलाईन निकालानंतर परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयापैकी (श्रेणी विषयाव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकाच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
यासाठी आवश्यक अटी, शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी मंगळवार, दि.२८ मे ते मंगळवार दि. ११ जून २०२४ पर्यंत अर्ज ऑनलाइन पध्दतीने करता येतील. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क भरता येणार आहे.
जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार दि. ३१ मे पासून पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ
१. https://mahresult.nic.in
२. http://sscresult.mkcl.org
३. https://sscresult.mahahsscboard.in
४. https://results.digilocker.gov.in
५. https://results.targetpublications.org
हेही वाचा:
cyclone remal । चक्रीवादळाचा धडकणार, ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा





