काँग्रेस दगाबाज ? पडद्याआड निवडणुकीत काँग्रेसचीच मतं फुटतात; तिसऱ्यांदा झाली पुनरावृत्ती

मुंबई : 12 जुलै रोजी महाराष्ट्रात विधानपरिषदेसाठीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला. यानंतर जयंत पाटील यांचा पराभव का झाला याचे कारण शोधले असता काँग्रेसच्या जवळपास 7 आमदारांनी क्रॉस मतदान केल्याचं समोर आले. यामुळे जयंत पाटील यांना पराभव पत्करावा लागला. काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याअगोदर काँग्रेसच्या आमदारांनी 3 वेळा क्रॉस वोटिंग केले होते. त्यामुळे दरवेळी पडद्याआड निवडणुकीत काँग्रेसचीच मतं का फुटतात त्याबद्दल आज सविस्तर जाणून घेऊयात….
काँग्रेस दगाबाज ?
गेल्या अडीच वर्षांच्या काळात एकदाच नव्हे तर जवळपास 3 वेळा वेगवेगळ्या निवडणुकांत काँग्रेसच्या आमदारांची मतं फुटली आहेत. फोडाफोडीच्या या राजकारणाला 2019 पासून सुरुवात झाली. या काळात विधानपरिषद आणि राज्यसभेच्या मतदानादरम्यान काँग्रेसमध्ये दगाबाजी झाल्याचं अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं. 2022 मध्ये याच कालावधीत विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली होती. २०२२ च्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांना उमेदवारी दिली होती. हंडोरे यांना अधिकची मते तर भाई जगताप यांना अतिरिक्त मतांबरोबरच विजयाचे गणित जुळविण्यासाठी त्यांनी बाहेरून मते मिळवावीत, अशी व्यूहरचना काँग्रेसकडून तयार करण्यात आली होती. मात्र या निवडणुकीत उलटे झाले आणि हंडोरे यांना दिलेली मतेच भाई जगताप यांच्याकडे गेली. परिणामी दुसऱ्या क्रमांकावरील जगताप निवडून आले तर चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
2024 च्या निवडणुकीत पुन्हा प्रत्यय
यंदा काँग्रेसची सहा ते सात मते फुटल्याचा संशय आहे. पक्षाच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना 30 मतांचा कोटा देण्यात आला होता. पण त्यांना पहिल्या पसंतीची पाच मते कमी पडली. अशोक चव्हाण यांच्याबरोबर असलेले तीन ते चार आमदारांची मते काँग्रेसने गृहित धरली नव्हती. याशिवाय दोन नेत्यांच्या घरातील मतांबाबत काँग्रेस नेत्यांना संशय होता. चार ते पाच मतांबाबत आम्हाला खात्री नव्हती. पण दोन अतिरिक्त मते फुटल्याने काँग्रेसच्या भूमिकेवर जोरदार टीका केली जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांकडून काँग्रेसवर टीका केली जात आहे.
काँग्रेसच्या आमदारांना महायुतीचे अभय
फुटलेल्या आमदारांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून देण्यात आला आहे. काँग्रेसने जर हे फुटीर आमदार कोण आहेत, हे शोधलं तर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली तर नवल वाटायला नको. जरी या आमदारांवर कारवाई झाली तर त्यांना महायुतीकडून अभय दिले जाऊ शकते. संबंधित आमदारांना महायुतीकडून विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.





