पोलंडमध्ये राजकीय आश्रयाचा अधिकार स्थगित; बेकायदेशीर शरणार्थ्यांना रोखण्यासाठी सरकारने उचलले पाऊल

पोलंड : पोलंडमध्ये बेकायदेशीर इमिग्रेशन कमी करण्यासाठी काही आश्रय अधिकार तात्पुरते निलंबित करण्याची योजना पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी जाहीर केली आहे. वॉर्सा येथे काल सिव्हिक प्लॅटफॉर्म पार्टीच्या एका अधिवेशनादरम्यान पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी पोलंडच्या निर्णयाला युरोपियन संघाची मान्यता मिळण्याची गरज असल्याचे सांगितले.
शत्रु राष्ट्रे आणि मानवी तस्करांकडून आश्रयाच्या अधिकाराचा गैरवापर होत आहे. देशात कोण प्रवेश करतो यावर आपल्या देशाने पूर्ण नियंत्रण मिळवले पाहिजे, असे असे टस्क यांनी यावेळी सांगितले. सरकार बेकायदेशीर स्थलांतर कमी करेल असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.
आपल्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणारी युरोपीय संघाची कोणतीही धोरणे पोलंड स्वीकारणार नाही, असे टस्क यांनी जोर देऊन सांगितले. पोलंडमध्ये दीर्घकाळ राहू इच्छिणाऱ्यांसाठी एकात्मतेच्या महत्त्वावर देखील त्यांनी जोर दिला. जर्मनीच्या स्थलांतर धोरणात एकात्मतेच्या मुद्याला प्राधान्य देण्यात भूतकाळात अपयश आले होते, याचा हवाला त्यांनी दिला.
रशिया-बेलारुसकडून शरणार्थ्यांना आमिष…
रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष सुरू झाल्यापासून युक्रेनमधील हजारो नागरिकांनी शेजारील पोलंडमध्ये आश्रय घेतला आहे. याशिवाय शेजारील बेलारुसमधून २०२१ पासून पोलंडमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर शरणाऱ्त्यांची घुसखोरी होते आहे. पश्चिमेला अस्थिर करण्यासाठी मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील स्थलांतरितांना बेलारूस आणि रशियाकडून आमिष दाखवले जात असल्याचा आरोप पोलंडमधील आतापर्यंतच्या काही सरकारांनी यापूर्वीदेखील केला आहे.





