वॉरसॉ (पोलंड) : पूर्व पोलंडमध्ये बुधवारी पहाटे एक अज्ञात उडणारी वस्तू धान्याच्या शेतात कोसळली आणि तिचा स्फोट झाला. ही वस्तू म्हणजे पोलंडच्या हवाई हद्दीचा भंग करून ड्रोन हल्ला झाल्याचा संशय व्यक्त होतो आहे. ओसिनी गावाजवळ पहाटे २ च्या सुमारास ही घटना घडली आणि घटनास्थळी जळालेले धातू आणि प्लास्टिकचे ढिगारे आढळले, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले. स्फोटामुळे काही घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या पण कोणीही जखमी झाले नाही. या घटनेमध्ये पोलंडमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त होतो आहे. पण शेजारील युक्रेन किंवा बेलारूसकडून रात्रीतून पोलिश हवाई क्षेत्राचे कोणतेही उल्लंघन झाल्याचे वृत्त नसल्याचे पोलंडच्या सशस्त्र दलांच्या ऑपरेशनल कमांडने बुधवारी सोशल मीडियावर सांगितले. हा स्फोट जुन्या इंजिनच्या प्रोपेलरच्या भागामुळे झाला असावा, असा अंदाज अधिकाऱ्यांनी सुरुवातीला व्यक्त केला. ती वस्तू बहुधा ड्रोन असावी, ते लष्करी ड्रोन होते की तस्करीचे हे निश्चित करण्यासाठी विश्लेषण सुरू आहे, असे संरक्षण मंत्री व्लाडिस्लॉ कोसिनियाक-कॅमिझ म्हणाले. तर घटनास्थळाची अनेक लष्करी तज्ज्ञांकडून तपासणी केली जाते आहे. रशियाने युक्रेनविरोधात युद्ध सुरू केल्यापासून, पोलिश हवाई क्षेत्रात अनेक घुसखोरी झाल्या आहेत, त्यामुळे युरोपीय संघ आणि नाटो सदस्य देशांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. पोलंड हा युक्रेनचा शेजारी देश असून युक्रेन-रशिया दरम्यानचे युद्ध सुरू झाल्यावर युक्रेनमधील लक्षावधी नागरिकांनी पोलंडमध्ये आश्रय घेतला आहे. पोंलंडच्या हद्दीमध्ये यापुर्वी रशियाचे एक क्षेपणास्त्र चुकून डागले गेले होते. पण ती गोष्ट रशियाने मान्य केली होती.