Pimpri-Chinchwad: मुन्नाभाईंचं बिंग फोडणारा कोडच गायब; शहरात ‘नो युवर डॉक्टर’चा पत्ताच नाही!
Pimpri-Chinchwad: शासनाचा आदेश, पण महापालिकेच्या वैद्यकीय विभागालाच माहिती नाही

– प्रकाश गायकर
पिंपरी – रुग्णालयात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांना संबंधित डॉक्टरांची शैक्षणिक पात्रता, वैद्यकीय नोंदणी क्रमांक आणि अधिकृत नोंदणीची माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासनाने ‘नो युवर डॉक्टर’ (Know Your Doctor) उपक्रमांतर्गत क्यूआर कोडच्या माध्यमातून माहिती उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे.
मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात या उपक्रमाबाबत अद्याप अनभिज्ञता असल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच याची माहिती नसल्याचे समोर आल्याने, शहरातील रुग्णालयांपर्यंत शासनाचे निर्देश पोहोचले आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
डॉक्टरांच्या पात्रतेबाबत पारदर्शकता असावी आणि रुग्णांना उपचार घेण्यापूर्वी संबंधित डॉक्टरांची अधिकृत माहिती तपासता यावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
रुग्णालये, दवाखाने आणि नर्सिंग होममध्ये लावण्यात येणारा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित डॉक्टरांची उपलब्ध अधिकृत माहिती रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना पाहता येणार आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या नोंदणीची पडताळणी करणे सोपे होणार असून, बोगस डॉक्टरांच्या समस्येला आळा घालण्यासही मदत होऊ शकते.
मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये या उपक्रमाची माहितीच संबंधित यंत्रणांना नसल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या प्रमुखांनाच याबाबत माहिती नसल्याने या उपक्रमाच्या स्थानिक अंमलबजावणीबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील रुग्णालयांमध्येही ‘नो युवर डॉक्टर’चा फलक दिसत नसल्याने रुग्णांना ही सुविधाच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.
शासनाच्या आदेशानंतर संबंधित विभागाने रुग्णालये आणि डॉक्टरांना सूचना देणे, अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करणे आणि आवश्यकतेनुसार तपासणी करणे अपेक्षित असते. मात्र, या उपक्रमाची माहितीच महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला नसेल, तर शहरातील रुग्णालयांपर्यंत त्याबाबतचे निर्देश पोहोचविण्याची प्रक्रिया झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.
पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या संख्येने खासगी रुग्णालये, दवाखाने आणि नर्सिंग होम आहेत. अशा परिस्थितीत डॉक्टरांची अधिकृत माहिती रुग्णांना सहज उपलब्ध करून देणारी व्यवस्था राबविणे आवश्यक आहे. मात्र, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागालाच याबाबत माहिती नसल्याने शहरात बोगस मुन्नाभाईंचा सुळसुळाट होण्याची शक्यता आहे.
ग्रामीण भागात अमंलबजावणी
पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण ठिकाणी असलेल्या छोट्या क्लिनिकपासून ते मोठ्या रुग्णालयांमध्ये नो युवर डॉक्टरचे कोड तसेच माहितीचे फलक लावण्यात आले आहेत. मात्र, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत त्याची अमंलबजावणी झाले नसल्याचे समोर आले आहे.
कारवाईची तरतूद
या अंतर्गत रुग्णालयांमध्ये कोड लावण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. मुदतीनंतर देखील रुग्णालय किंवा क्लिनिकमध्ये नो युवर डॉक्टरचे फलक लावलेले नसतील तर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये पहिल्या वेळेस नियम मोडल्यास नोटीस आणि नियमांचे पालन करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात येईल.
त्यानंतर दुसऱ्यांदा नियम मोडल्यास ५ हजार रुपये दंड, तिसऱ्या वेळेस १५ हजार रुपये आणि त्यानंतर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी ३१ ऑक्टोबर अखेर सर्व रुग्णालयांमध्ये हे फलक लावणे बंधनकारक आहे. मात्र, पिंपरी चिंचवडमध्ये याची माहितीच खुद्द वैद्यकीय विभागालाच नसल्याचे समोर आले आहे.
‘नो युवर डॉक्टर याबाबत काही आदेश प्राप्त नाहीत. मात्र, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये असलेल्या रुग्णालयांमध्ये दरपत्रक लावण्याबाबच सुचित करण्यात आलेले आहे. त्यामध्ये अनेक रुग्णालयांनी आमच्याकडे अनेक उपचार असून त्या सर्वांची यादी व दरपत्रक दर्शनी भागात लावणे शक्य नसल्याचे कळवले आहे. त्यावर काम सुरू असून लवकरच याबाबत पुस्तिका किंवा कोड लावणे बंधनकारक करण्यात येणार आहे.’ – डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी.





