Water scarcity : पाणीटंचाई रोखण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करा; विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची मागणी
Water scarcity : आगामी काळात पाण्याचे संकट गंभीर होण्याची शक्यता व्यक्त

पिंपरी – शहरातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी महापालिकेने आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे.
पाणीगळती रोखण्यासाठी फिरते दुरुस्ती पथक स्थापन करणे, पिण्याच्या पाण्याने वाहने धुण्यावर बंदी घालणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना किमान एक हजार रुपयांचा दंड आकारण्याची मागणी भोईर यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.
शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या पुढे गेली असून वाढते शहरीकरण लक्षात घेता आगामी काळात पाण्याचे संकट गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. घरांमधील नळ व पाइपलाइनची गळती महापालिकेने मोफत किंवा नाममात्र शुल्कात दुरुस्त करून द्यावी.
नवीन मोठ्या बांधकामांमधील पाणीवापरावर तात्पुरते निर्बंध घालावेत, तसेच सार्वजनिक आणि खासगी विहिरी व बोअरवेलच्या पाणीवापराचे नियोजन करावे, अशीही मागणी आहे. पाणी व्यवस्थापनासाठी विशेष समिती स्थापन करून दर पंधरा दिवसांनी आढावा घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
नागरिकांमध्ये पाणी बचतीबाबत जनजागृती करणे, सांडपाण्याचा पुनर्वापर वाढविणे आणि गरजूंसाठी माफक दरात झुणका-भाकर केंद्रे सुरू करण्यासाठी सेवाभावी संस्थांना सहकार्य करण्याचे आवाहनही निवेदनात करण्यात आले आहे. संभाव्य संकट टाळण्यासाठी महापालिकेने या सूचनांची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी भोईर यांनी केली आहे.
‘शहरात पाणी टंचाई तीव्र होणार आहे. त्यासाठी महापालिकेने आतापासूनच सावध झाले पाहिजे. पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. तसेच या परिस्थितीत नागरिकांनी देखील महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे.’- भाऊसाहेब भोईर, विरोधी पक्षनेते.





