रुपयाची घसरण थांबता थांबेना; भारतात महागाई वाढण्याची भीती

मुंबई – जागतिक बाजारात डॉलर वधारत असतानाच भारतीय स्थूल अर्थव्यवस्था कमकुवत असल्याची आकडेवारी जाहीर होत आहे. अशा परिस्थितीत रुपयाचे मूल्य कमी होत असल्यामुळे भारताला आयात महागात पडत आहे. त्यामुळे भारतातील महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्यासाठी रिझर्व बँक तीन महिन्यापासून प्रयत्न करत आहे.
सोमवारी रिझर्व बँकेने काही सरकारी बँकांना आपल्याकडील डॉलरचा साठा बाजारात उपलब्ध करण्याची सूचना केली. मात्र त्यानंतरही दिवसा अखेर रुपयाचे मूल्य चार पैशांनी कोसळून 85 रुपये 83 पैसे यांना पातळीवर गेले. शेअर बाजाराचे निर्देशांक तब्बल दीड टक्क्याने कोसळल्यामुळे रुपयाला आधार मिळणे अशक्य झाले असे चलन बाजारातील व्यापार्यांनी सांगितले. रुपया कोसळत असतानाच सहा चलनाच्या तुलनेत अमेरिकेचा डॉलर बळकट होऊन आता 108.44 या अंकावर गेला आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये हा निर्देशांक केवळ शंभर अंकावर होता.
यामुळे भारतीय रुपयाबरोबरच इतर जागतिक चलनाचे मोठ्या प्रमाणात अवमूल्यन होत आहे. एकीकडे अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह विविध देशाबरोबर व्यापार युद्ध करण्याची घोषणा केली असतानाच चीनमध्ये संसर्गजन्य आजार वाढत असल्यामुळे जागतिक चलन बाजारावर याचा नकारात्मक परिणाम होत असल्याचे व्यापार्यांनी सांगितले.
दरम्यान, रुपया कोसळत असल्यामुळे असल्यामुळे भारताला आयात महागात पडत असली तरी भारताला निर्यात वाढविणे यामुळे सहज शक्य होत आहे. या परिस्थितीचा भारतातील निर्यातदार फायदा घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येते. एकीकडे रुपयाचे मूल्य सावरण्यासाठी रिझर्व बँक प्रयत्न करीत असताना आज खनिज तेलाच्या किमती वाढून 76 डॉलरवर गेल्या आहेत. त्याचबरोबर परकीय गुंतवणूक परत जात आहे. शुक्रवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 4,227 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. याचा दबाव रुपयावर येत आहे.




