आज रुपया 37 पैशांनी घसरला; कारण काय? जाणून घ्या

मुंबई – अमेरिकेची अर्थव्यवस्था खराब झाल्यामुळे पुन्हा जगभरात सुरक्षित गुंतवणूक साधनाकडे गुंतवणूक वळत आहे. याचा परिणाम भारतीय रुपयावर होऊ लागला आहे. दरम्यानच्या काळामध्ये खनिज तेलाच्या किमतीही वाढल्यामुळे रुपयाची घसरण होत आहे. गुरुवारी रुपयाचा भाव डॉलरच्या तुलनेत 37 पैशांनी कोसळून रुपयाचा भाव 85.96 रुपये प्रति डॉलर या पातळीपर्यंत खाली गेला. गेल्या तीन दिवसांमध्ये रुपयाचा भाव तब्बल 54 पैशांनी कमी झाला आहे.
विश्लेषकांनी सांगितले की, महिन्याची अखेर जवळ आली आहे. अशा परिस्थितीत आयात करणार्या कंपन्यांनी डॉलरची मागणी वाढविली आहे. परदेशी बँकांनीही डॉलरची मागणी वाढविली आहे. याचाही रुपयांच्या मूल्यावर परिणाम होत आहे. दरम्यान रशिया- युक्रेन चर्चा यशस्वी होण्याचे संकेत मिळत आहेत. त्याचबरोबर मध्यपूर्व येथील तणाव कायम आहे. याचाही परिणाम जागतिक चलन बाजारावर आणि रुपयावर होत असल्याचे दिसून येते.
एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे चलन बाजारविषयक तज्ञ दिलीप परमार यांनी सांगितले की, आगामी काळात रुपया कोसळण्याच्या शक्यतेमुळे बर्याच आयातदारांनी डॉलरची मागणी वाढविली आहे. याचा परिणाम रुपयाच्या मूल्यावर होत आहे. अमेरिका आणि जपानच्या कर्जरोख्याबरोबरच भारताच्या कर्जरोख्यावरील परतावाही वाढत आहे. त्यामुळे लोक सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत असल्याचे वातावरण आहे.
दरम्यान जगातील मुख्य चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य दर्शविणारा डॉलर इंडेक्स 0.25 टक्क्यांनी वाढून 99.80 या अंकावर आहे. ही डॉलरची पातळी समाधानकारक पातळीवर असली तरी आगामी काळामध्ये डॉलर कमकुवत होण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटत आहे.
या आठवड्यात शेअर निर्देशांकात बरीच घट झाली आहे. गुरुवारी निर्देशांक 0.75 % कमी झाले. यामुळे रुपयाच्या मूल्यावर काही प्रमाणात दबाव येत आहे. विशेष म्हणजे बुधवारी परदेशी संस्थापक गुंतवणूकदारांनी 2,201 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी करूनही रुपयाच्या मूल्यावर दबाव कायम आहे. मात्र पुढील आठवड्यामध्ये रुपयाचे मूल्य स्थिर होईल असे काही विश्लेषकांनी नमूद केले.




