आज मंगळवारी रुपया पुन्हा घसरला; आता एक डाॅलर म्हणजे किती रुपये पहा

मुंबई – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांना आयात शुल्क वाढविण्याची धमकी दिल्यामुळे जागतिक व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. अशा परिस्थितीत महिना अखेर असल्यामुळे आयातदारानी डॉलरची मागणी वाढविली. यामुळे मंगळवारी रुपयाचा भाव 25 पैशांनी कमी होऊन 86 रुपये 56 पैसे प्रति डॉलर या पातळीवर गेला.
भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक बरेच वाढले असले तरी परदेशी गुंतवणूकदारांनी मात्र विक्री चालूच ठेवली असल्यामुळे या निर्देशांक वाढण्याचा रुपयाला आधार मिळू शकला नाही असे विश्लेषकांनी सांगितले. दरम्यान खनिज तेलाचे दर माफक पातळीवर आहेत. त्याचबरोबर डॉलर इंडेक्स फारसा वाढलेला नाही. यामुळे रुपयाची आगामी काळात जास्त हानी होणार नाही असे समजले जाऊ लागले आहे.
महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आयात करणार्यांकडून डॉलरची मागणी वाढत असते. या कालावधीत रुपयाच्या मूल्यावर दबाव येत असतो. मात्र नंतर परिस्थिती सामान्य होते. चलन बाजारातील व्यापार्यांनी सांगितले की, गुंतवणूकदारांचे लक्ष आता रिझर्व बँकेच्या पत धोरणाकडे आणि अर्थसंकल्पाकडे आहे. त्याचबरोबर अमेरिका पतधोरणात काय करते याकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.





