साताऱ्याचा आगामी खासदार महायुतीचाच

सातारा – युतीच्या धर्माप्रमाणे सातारा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचाच आहे. महायुतीचे वरिष्ठ जो उमेदवार देतील, त्याला निश्चितच निवडून आणू. आगामी लोकसभा निवडणुकीत साताऱ्याचा खासदार महायुतीचाच असेल, असा दावा शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. आजपर्यंत खंडाळा तालुक्याला आमदार किंवा खासदारकीला कधीच प्रतिनिधित्व मिळाले नसल्याची खंतदेखील त्यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, धनगर आरक्षणासाठी लोणंद येथे उपोषण सुरू आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांना लोणंदला घेऊन गेलो होतो. तेथील उपोषण स्थगित करण्याची विनंती केली; पण ते थांबलेले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वांसाठी काम करत आहेत.
मराठा समाजासाठी मनोज जरांगे हे आंदोलन करत आहेत. आम्ही सत्ताधारी असलो, तरी त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होईपर्यंत त्यांच्याबरोबर काम करणार आहोत. मी 2010 पासून शिवसेनेचे काम करत आहे. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांसाठी निधी देण्यात शासन कमी पडत नाही. मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना दोन कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
खंडाळा तालुक्याला विधानसभा, लोकसभेत आजपर्यंत प्रतिनिधित्व न मिळाल्याने अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. वीज, मांढरदेव रस्ता, एमआयडीसी या प्रश्नांवर मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर विजेचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागला आहे. वाईतील चार कोटींची जललक्ष्मी योजना, मांढरदेव रस्त्याचा प्रश्नही मार्गी लावला आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याला निधीमध्ये झुकते माप दिले आहे. कोयना पर्यटनाला मान्यता दिली आहे. कास परिसरातील मुनावळे येथे स्कुबा डायव्हिंग सुरू केले आहे. मेडिकल कॉलेज, जिहे-कठापूर भुयारी मार्ग हे विषय मार्गी लागत आहेत, असे त्यांनी सांगितले.
सातारा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळणार का? तुम्ही इच्छुक आहात का, या प्रश्नावर ते म्हणाले, युतीच्या वाटपात ही जागा शिवसेनेकडेच आहे. यापूर्वी हिंदुराव निंबाळकर निवडून आले होते. वरिष्ठ देतील, त्या उमेदवाराला आम्ही निवडून आणणार आहोत. 2009 मध्ये अपक्ष लढून अडीच लाख मते मिळवली होती. तत्कालीन संपर्कप्रमुख बानगुडे-पाटील यांच्यामुळे 2019 मध्ये शिवसेनेत गेलो आणि लोकसभेला उभे राहिलो. मी उदयनराजे यांचेही काम केले. आगामी निवडणूक भाजपसाठी नव्हे, तर भारतासाठी आहे. आम्हाला महायुतीचा खासदार निवडून आणायचा आहे.
आमदार मकरंद पाटील यांच्यावर माझा रोष नाही. ते युतीत आल्याने मला कोणतीही अडचण नाही. आमची ताकद चार विधानसभा मतदारसंघांमध्ये आहे. त्यामुळे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळाल्यास, आमचा उमेदवार भरघोस मतांनी निवडून येईल.





