जागतिक आरोग्य संघटनेशी अमेरिकेने नाते तोडले
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

वॉशिंग्टन – जागतिक आरोग्य संघटना ही आपत्तीच्या काळात अपेक्षित काम करू शकलेली नाही आणि चीनच्या तालावर काम करत असून जगाची दिशाभूल करत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेबरोबरचे नाते अमेरिका तोडून टाकणार असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे.
करोनाच्या साथीच्या पार्श्वभुमीवर “डब्लूएचओ’कडून चीनला जबाबदार धरले जात नाही आहे. उलट “डब्लूएचओ’कडून चीनची बाजू घेतली जात आहे, असा आरोपही ट्रम्प यांनी केला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेवर चीनचे संपूर्ण नियंत्रण आहे, असे सांगून चीनवरील कठोर निर्बंधांचीही घोषणा त्यांनी शुक्रवारी केली. चीनवरील कारवाईसाठी केलेल्या विनंतीनुसार “डब्लूएचओ’कडून काहीही झाले नाही. तसेच आरोग्य क्षेत्रातील सुधारणांबाबतही काहीही झाले नाही. त्यामुळे “डब्लूएचओ’शी असलेले सर्व संबंध अमेरिका तोडून टाकणार आहे.
या संघटनेला दिला जाणारा निधी आरोग्यक्षेत्रातील तातडीच्या गरजांसाठी जागतिक पातळीवरच्या अन्य पात्र संघटनांकडे वळवण्यात येईल. विषाणूवरून चीनकडून जगाला उत्तरे हवी आहेत. या संदर्भात पारदर्शकता असणे आवश्यक आहे, असेही ट्रम्प यांनी सांगितले.
जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून दरवर्षी 45 कोटी डॉलर इतका निधी दिला जातो. याशिवाय स्वेच्छेने काही कार्यक्रमांमध्ये सहभागही नोंदवला जातो. हा सहभाग आता दिला जाणार नाही, असे ट्रम्प म्हणाले.
चीनविरोधात कठोर निर्बंधही…
चीनविरोधातील काही उपाय योजनांची घोषणाही ट्रम्प यांनी केली. त्यामध्ये चिनी विद्यार्थी आणि संशोधकांना अमेरिकेमध्ये प्रवेश नाकारला जाणार आहे. चिनी कंपन्यांना अमेरिकेत गुंतवणूकीसही मज्जाव केला जाणार आहे.
हॉंगकॉंग शहरावर चीनने लादलेल्या नवीन नियंत्रणांच्या प्रत्युत्तरादाखल अमेरिका हॉंगकॉंगबाबतची विशेष वागणूक संपुष्टात आणेल. हॉंगकॉंगमधील पाळत ठेवण्याच्या कायद्याला विरोध करण्यासाठी अमेरिका आपल्या प्रवासी सूचनांमध्येही दुरुस्ती करेल,असेही ट्रम्प यांनी सांगितले.





