Pune : एनआयबीएम येथे वृक्षतोडीबाबत केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने राज्यसरकारकडून माहिती मागवली

पुणे : एन आय बी एम परिसरातील वृक्षतोडीबाबत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने राज्य सरकारकडून माहिती मागवली आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने या संदर्भात स्वत:हून प्रकरण दाखल केले आहे. त्यासाठी ही माहिती मागवण्यात आली आहे. मंत्रालयाने न्यायाधिकरणाला सांगितले की त्यांनी राज्य सरकारकडून माहिती मागवली आहे आणि राज्य सरकारच्या उत्तराची वाट पाहत आहे.
एनआयबीएम येथील वृक्षतोडीबाबतचा प्रकार प्रसारमाध्यमांमधून उघडकीला आल्यानंतर एनजीटीने स्वत:हून अॅक्शन घेत प्रकरण नोंदवले होते. एनआयबीएम परिसरातील राखीव वनक्षेत्रात येणाऱ्या वृक्षतोडीबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली होती होती.
एनजीटीच्या दाखल प्रकरणांवर एनजीटीच्याच पश्चिम खंडपीठामार्फत या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे आणि एनजीटीने १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या याआधीच्या सुनावणीत प्रधान मुख्य वनसंरक्षक (पीसीसीएफ), एमओईएफसीसी आणि पुण्याच्या जिल्हा दंडाधिकारी यांना वृक्षतोडीबाबत त्यांचे उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते.
दरम्यान, या प्रकरणी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जबाब नोंदवला नाही, त्यामुळे न्यायाधिकरणाने पुन्हा एकदा जिल्हा दंडाधिकाऱ्यांना याप्रकरणी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ जानेवारी रोजी होणार आहे.





