बेरोजगारीचा दर 3 टक्क्यांच्या खाली येईल; केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांचा दावा

नवी दिल्ली : नोकऱ्या कमी झाल्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही, भविष्यात देशातील बेरोजगारीचा दर 3 टक्क्यांच्या खाली येईल असा दावा केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी लोकसभेत बोलताना केला. ते म्हणाले की सध्याचा बेरोजगारीचा दर 3.2 टक्के आहे. 2017-18 या कालावधीत तो 6 टक्के इतका होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये रोजगार निर्मिती झाली आहे, त्यामुळे हा बेरोजगारीचा दर खाली येत आहे असे मांडविया यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सांगितले. देशातील वर्कफोर्सचे प्रमाणही सध्या वाढत आहे असे त्यांनी नमूद केले.
पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना, मंत्री म्हणाले की बेरोजगारीचा दर, जो 2017-18 मध्ये 6 टक्के होता, तो 3.2टक्क्यांवर आला आहे आणि तो आणखी ३ टक्क्यांच्या खाली येईल.नोकरी गमावण्याची चिंता करण्याची गरज नाही आणि देशात नोकऱ्यांची कमतरता नाही, असे मांडविया यांनी सांगितले.





