Unemployment: बेरोजगारांना नोकरी अन् उद्योगांना कामगार मिळेनात! उत्पादन वाढवायचे कसे?
Unemployment: कुशल मनुष्यबळाचा अभाव; कामगार टंचाईमुळे उद्योगांसमोर आव्हान

पिंपरी – दुष्काळामुळे वाढत्या बेरोजगारीचा प्रश्न सातत्याने चर्चेत असताना दुसरीकडे उद्योगांना कामगार मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. कुशल मनुष्यबळाचा अभाव, अपुरे वेतन, वाढता महागाईचा खर्च आणि रोजगारातील अनिश्चितता यामुळे औद्योगिक क्षेत्रासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
शहरात अभियांत्रिकी, फॅब्रिकेशन, फाउंड्री, वस्त्रोद्योग, रबर, सिमेंट उत्पादने, अन्न प्रक्रिया, कोल्ड स्टोअरेज आणि पीव्हीसी पाइप निर्मिती असे विविध व्यवसाय येथे चालतात. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये इंधन आणि औद्योगिक गॅसच्या टंचाईमुळे अनेक उद्योगांच्या कामकाजावर परिणाम झाला. उत्पादन घटल्याने कामाचे तासही कमी झाले.
इंधन दरवाढ आणि गॅसच्या तुटवड्यामुळे उद्योगांचे उत्पादन घटले. पूर्वी १२ तास काम करणाऱ्या अनेक कामगारांना आठ तासांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात घट झाली.
दुसरीकडे, महागाईमुळे जेवण, निवास आणि दैनंदिन खर्च वाढले. कमी उत्पन्नात स्वतःचा खर्च भागवून गावी पैसे पाठवणे कठीण झाले. कामगारांच्या कमतरतेमुळे उद्योगांचे दैनंदिन नियोजन विस्कळीत झाले आहे. उत्पादनासाठी आवश्यक कुशल कामगार उपलब्ध होत नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
उत्पादन खर्च, इंधन आणि वाहतुकीचा खर्च वाढला आहे. औद्योगिक गॅस सिलिंडर मिळण्यात अजूनही अडथळे येत आहेत. त्यामुळे उत्पादन क्षमतेवर परिणाम होत आहे. आर्थिक नुकसान सहन करण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे. एकीकडे नवीन ऑर्डर मिळवण्याचे आव्हान आहे. दुसरीकडे, आधीच मिळालेल्या ऑर्डर वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. पुरेसे कामगार नसल्याने दोन्ही आघाड्यांवर उद्योजकांची कोंडी होत आहे.
स्थानिकांना रोजगार देण्यात अडचणी
पिंपरी चिंचवड शहरातील उद्योगांची सुमारे ६० टक्के भिस्त परप्रांतीय कामगारांवर आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशातून अनेक कामगार रोजगारासाठी या भागात आले आहेत. मात्र, स्थानिक कामगारांना अपेक्षित वेतन मिळत नसल्याची नाराजी आहे. काही कामांसाठी आवश्यक कौशल्य आणि अनुभवाचा अभाव असल्याने उद्योगांना स्थानिक मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यात अडचणी येतात.
दुसरीकडे, कष्टाची कामे करण्याबाबत स्थानिक तरुणांमध्ये अनास्था असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. पदवीधर आणि अभियंत्यांनाही काही तांत्रिक किंवा शारीरिक श्रमाच्या कामांमध्ये रस नसतो. त्यामुळे शिक्षण आणि उद्योगांच्या प्रत्यक्ष गरजा यांच्यातील अंतर समोर आले आहे. कौशल्य प्रशिक्षण आणि नियमित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यास ही दरी कमी होऊ शकते.
कामागारांच्या मते उद्योगांनी कामगारांना सामाजिक सुरक्षा देणारी धोरणे स्वीकारण्याची गरज आहे. कामगार कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी, योग्य वेतन आणि रोजगारातील स्थैर्य यांना महत्त्व द्यावे लागेल. औद्योगिक क्षेत्रांत कामाच्या संधी शोधणाऱ्या स्थानिक तरुणांचा विचारही उद्योजकांनी करायला हवा. स्थानिक पातळीवर योग्य वेतन आणि सुविधा दिल्यास उद्योगांना कामगार मिळण्यास मदत होऊ शकते.
कामगार टिकवण्यासाठी कोणते उपाय?
काम सोडून गेलेल्या कुशल कामगारांना पुन्हा बोलावण्यासाठी उद्योजक प्रयत्न करत आहेत. मात्र, कामगारांकडून अधिक मजुरी, नियमित काम आणि चांगल्या निवास सुविधांची मागणी होत आहे. काही ठिकाणी कामगार पुरवठादारांकडून आगाऊ रक्कमही मागितली जात आहे.
तसेच, १२ तासांच्या कामाऐवजी आठ तासांच्या दोन शिफ्टचे नियोजन करता येईल. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर होऊ शकतो. कामगारांवरील ताण कमी करण्यासही मदत मिळेल.
कौशल्यविकासाला उद्योगांची जोड हवी
स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि तंत्रनिकेतनांशी उद्योगांनी करार करावेत. उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षण द्यावे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण आणि प्रशिक्षणानंतर रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी. यामुळे कुशल मनुष्यबळाची निर्मिती होऊ शकते.
पिंपरी-चिंचवडसाठीही महत्त्वाचा मुद्दा
पिंपरी-चिंचवड हे अभियांत्रिकी, वाहननिर्मिती, सुटे भाग आणि विविध उत्पादन उद्योगांचे महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे उद्योगांची वाढ आणि कामगारांची उपलब्धता यांचा थेट संबंध आहे. केवळ बेरोजगारीची आकडेवारी मांडून प्रश्न सुटणार नाही. उद्योगांना आवश्यक कौशल्य असलेले कामगार मिळणे आणि कामगारांना योग्य वेतनासह सुरक्षित रोजगार मिळणे, या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत.
उद्योगांनी कामगारांना केवळ उत्पादनाचा घटक न मानता त्यांच्या गरजा आणि अडचणी समजून घेणे आवश्यक आहे. योग्य वेतन, सामाजिक सुरक्षा, निवास सुविधा आणि कौशल्यविकासाला प्राधान्य दिल्यास कामगार टिकवणे सोपे होईल. त्यातून उत्पादन वाढीसह स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधीही निर्माण होऊ शकतील.





