Mahatma Phule Memorial: महात्मा फुले स्मारकासाठी २३० कोटी
Mahatma Phule Memorial:

मंत्रिमंडळ ओबीसी उपसमितीच्या बैठकीत निर्णय
Mahatma Phule Memorial: महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त पुण्यातील फुलेवाडा परिसराच्या संपूर्ण विकासासाठी २३० कोटी रुपयांच्या विकास प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनांनुसार या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत फुलेवाडा परिसराचे सुशोभीकरण करण्यासोबतच आवश्यक जमीन संपादन करून संपूर्ण परिसराचा कायापालट केला जाणार असल्याची माहिती मंत्रिमंडळ ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
मंत्रालयात समितीची विशेष बैठक बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. या वेळी अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, मृद आणि जलसंधारणमंत्री संजय राठोड, तसेच इतर मागास आणि बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत महात्मा फुले यांच्या जयंती वर्षानिमित्त बहुजन आणि इतर मागास प्रवर्गाच्या कल्याणासाठी अनेक धोरणात्मक निर्णय जाहीर करण्यात आले. ऐतिहासिक भिडेवाडा येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या मुलींच्या शाळेचे स्मारक उभारणीचे काम येत्या तीन आठवड्यांत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश या वेळी देण्यात आले,
तसेच महसूल, पाणीपुरवठा आणि वन विभागासह दुष्काळ निवारणावर काम करणाऱ्या ११ प्रमुख विभागांच्या सर्व कल्याणकारी उपाययोजना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबाबतचे स्वतंत्र शासन निर्णय लवकरच निर्गमित केले जाणार आहेत.





