अमेरिकेची आता इराकमधूनही घरवापसी; वर्षाच्या अखेरपर्यंत सैन्य मागे घेणार

वॉशिंग्टन – अमेरिका आता अफगाणिस्ताननंतर इराकमधूनही घरवापसी करणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल काजिमी यांच्या दरम्यान याबाबतचा करार झाला आहे. जवळपास 18 वर्षानंतर अमेरिका इराकमधून माघारी परतणार आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत अमेरिकन सैन्य इराक सोडणार आहे.
मात्र, इराकी सैन्याला प्रशिक्षित करण्यासाठी काही अमेरिकन सैन्य इराकमध्ये असणार आहे. अफगाणिस्ताननंतर इराकमधूनही माघार घेतल्याने दोन्ही देशातील अमेरिकेची लष्करी मोहीम थांबली आहे. इराकमधील सद्दाम हुसेन राजवटीचा पाडाव करण्यासाठी अमेरिकेने त्या देशात आपले हातपाय पसरले होते. सद्दाम यांची राजवट गेल्यानंतर तेथे निर्नायकी अवस्था झाली होती.
त्यातच इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा उदय आणि वेगाने प्रसार झाल्यानंतर अमेरिकेला तेथेच गुंतून राहावे लागले. मात्र अफगाणिस्ताप्रमाणेच हाही अमेरिकेच्या गळ्यात अडकलेला काटा ठरला होता. अखेर तेथे आता केवळ सल्लागाराच्या भूमिकेत राहून मदत करण्याचा अमेरिकेचा मनसुबा आहे.
बायडेन यांनी सांगितले की, इराकमधील आमची लष्करी मोहीम या वर्षाच्या अखेरपर्यंत थांबणार आहे. मात्र, इराकी सैन्याला प्रशिक्षण देणे, इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेचा सामना करण्यासाठी आवश्यक मदत करण्याची भूमिका अमेरिकेची असणार असल्याचे त्यांनी म्हटले.
बायडेन प्रशासनातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, आयएसचा पराभव करण्यासाठी इराकची मदत करणे हे अमेरिकेचे उद्दिष्ट होते. आता, या भूमिकेत बदल झाला असून इराकी सैन्याला सल्ला आणि प्रशिक्षण देण्याची भूमिका अमेरिकेची असणार आहे. इराकी सैन्याने देशाचे संरक्षण करण्यास सक्षम असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र, अजूनही इराकला आयएसचा धोका असल्याचे बायडन प्रशासनाचे म्हणणे आहे.
आयएस आता इतके शक्तीशाली राहिले नाही. मात्र, दहशतवादी हल्ले करण्यास सक्षम असल्याचे त्यांनी दाखवून दिले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भर बाजारात आत्मघाती हल्ला केला होता.





