पुण्यातील शास्त्रज्ञांनी रोवला जगात झेंडा

पुणे -“यूएस’च्या “स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी’ने जगभरातील शास्त्रज्ञांचे रॅंकिंग केले असून, त्यातील पहिल्या दोन टक्के टॉपर शास्त्रज्ञांमध्ये पुण्यातील “डीफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’अंतर्गत असलेल्या “डीफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी’ (डीआयएटी)च्या चार प्राध्यापकांचा समावेश झाला आहे. हे शास्त्रज्ञ त्यांच्या विशेष क्षेत्रातील तंत्रज्ञानात जगात अव्वल ठरले आहेत.
“व्हर्टिकल्स ऑफ मटेरियल्स’ या विषयात प्रा. बालसुब्रमण्यम के., रसायन विषयात प्रा. पी. के. खन्ना आणि प्रा. प्रशांत कुलकर्णी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये डॉ. बझील राझ हे ते चार प्राध्यापक आहेत. अलीकडेच, “डीआयएटी’च्या सदस्यांचा “फेलो ऑफ रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री’ (यूके) आणि “फेलो इफ इंडियन नॅशनल ऍकॅडमी ऑफ इंजिनिअर्स’ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
“डीआयएटी’ हे संरक्षण क्षेत्राशी संबंधित तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी स्वतंत्र संशोधन विद्यापीठ म्हणून विकसित होत आहे. अलीकडेच “मानव संसाधन विकास विभागा’च्या “नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क’ (एनआयआरएफ) या उच्च शिक्षण संस्थांचे मानांकन करणाऱ्या संस्थेच्या यादीत 57 व्या क्रमांकावर आहे.
‘ डीआयएटी’ ही संस्था आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून संपूर्णपणे राष्ट्राची सुरक्षा करण्यासाठी एक मोठी टीम म्हणून कार्य करण्यास सज्ज आहे.- डॉ. सी. पी. रामनारायणन, कुलगुरू, “डीआयएटी’





