पीएमपीएमएल अध्यक्षांच्या दालनात दोघे बेकायदा घुसले

पुणे -पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकाच्या कार्यालयात दोन व्यक्ती बेकायदा घुसल्या. त्यांनी अध्यक्षांच्या दालनात त्यांचा संगणक सुरू करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याबाबत पीएमपीएमएलचे रखवालदार आरिफ हुसेन तांबोळी (रा. महात्मा फुले गंज पेठ) यांनी स्वारगेट पोलिसांत तक्रार दिली आहे.
शुक्रवारी ही घटना घडली. त्यावेळी रखवालदार म्हणून तांबोळी हे ड्युटीवर होते. त्या दोन व्यक्ती अध्यक्षांच्या दालनात घुसल्या होत्या. त्या दोघांना तांबोळी यांनी हुसकावून लावले. नंतर चौकशी केली असता, कैलास बन्सीलाल त्रिवेदी (वय 46, रा. कोथरूड) आणि राहुल विठ्ठल ताथवडे (वय 38, रा. कोंढवा) अशी त्या दोघांची नावे असल्याचे तांबोळी यांना कळले.
अध्यक्षांच्या दालनात विनापरवानगी जाऊन संगणक सुरू करण्याचा प्रयत्न करणे हा गंभीर गुन्हा आहे. त्या दोघांनी औद्योगिक शांततेचा भंग केला आहे. त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी, असे तांबोळी यांनी तक्रारीत म्हटले आहे. या अर्जावर पोलीस प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत कारवाईचे काम सुरू होते.




