प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदार याद्या आज (दि.१४) प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा प्राधिकृत अधिकारी प्रदीप जांभळे यांनी मतदार यादी प्रसिध्द करण्याच्या तयारीचा आढावा घेतला. तसेच, मतदार यादीवर प्राप्त होणाऱ्या हरकती आणि सूचनांबाबत दिलेली जबाबदारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश जांभळे यांनी दिले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी १४ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवर नागरिकांना हरकती व सूचना दाखल करण्यासाठी १४ ते २२ नोव्हेंबर २०२५ हा कालावधी देण्यात आला आहे. या काळात नागरिकांकडून प्रारूप मतदार यादीवर येणाऱ्या हरकती व सूचना स्वीकारण्यासाठी अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये, तसेच सावित्रीबाई फुले सभागृह येथे मुख्यालय स्तरावर कक्ष कार्यान्वित करण्यात येणार आहे. या कामकाजासाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना कामकाजाचे स्वरूप आणि प्रक्रिया याबद्दल पिंपरीतील सावित्रीबाई फुले सभागृहात माहिती देण्यात आली. तसेच, मतदार याद्या प्रसिध्द करण्याच्या तयारीला आढावा प्राधिकृत अधिकारी जांभळे यांनी घेतला. यावेळी सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून, विहित पद्धतीने हरकती व सूचनांवरील सुनावणीची प्रक्रिया पार पाडण्याचे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीला निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार, स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, सहायक संचालक नगररचना प्रशांत शिंपी, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, डॉ. प्रदीप ठेंगल, राजेश आगळे, सिताराम बहुरे, सहाय्यक आयुक्त राजीव घुले, किरणकुमार मोरे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, कार्यालय अधीक्षक रमेश यादव आदी उपस्थित होते. हरकती स्विकारण्यासाठी वेळापत्रक जाहीर.. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमावलीनुसारच हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार असून, नजीकच्या प्रभाग कार्यालयात अथवा सावित्रीबाई फुले सभागृहातील कक्षामध्ये या हरकती व सूचना १४ ते २१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवसांसह सकाळी पावणेदहा ते सायंकाळी सव्वा सहा यावेळेत स्वीकारल्या जातील. तर, दिनांक २२ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत हरकत आणि सूचना स्वीकारल्या जातील.