Vidhan Sabha Election : विधान परिषदेसाठी रणशिंग फुंकले ! ‘मविआ’च्या नेत्यांची महत्वाची बैठक; काय आहे मास्टर प्लॅन? पाहा….

Vidhan Sabha Election – महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तयारी सुरू केली आहे. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत विधान परिषद निवडणुकीबाबत रणनिती निश्चित करण्यात आली आहे. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीबाबतही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
विधान परिषदेची 12 जुलैला निवडणूक होत आहे. या निवडणुकीत मविआचे तीन उमेदवार मैदानात आहेत. निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव व्हावी यासाठी काही महत्त्वाच्या नेत्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या तीन जागांवर विजय कसा मिळविता येईल यावर चर्चा करण्यात आली. शिवाय आपल्याकडे पुरेस संख्याबळ असल्याचा दावाही यानिमित्ताने मविआने केला आहे.
विधान परिषदे सोबत विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच जागावाटप संदर्भात चर्चा सुरू केल्या जातील असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. जागावाटपा संदर्भात प्राथमिक चर्चा या बैठकीत झाली आहे. लवकरच मुंबईमध्ये राज्यभरातील तीनही पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला जाणार आहे. एक जाहीर भव्य सभाही घेतली जाईल.
लोकसभा निवडणुकीत मविआला मोठे यश मिळाले होते. या सभेच्या माध्यमातून जनतेचे आभार मानले जातील.या सभेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाईल. दरम्यान मविआतील सर्व पक्ष एकत्र आहेत. निवडणुकीलाही आम्ही एकत्रीत सामोरे जावू, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्या जिल्ह्यात मविआचे मेळावे घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही याला दुजोरा देत मविआ एकसंधपणे लढेल, असे सांगितले.





