Vaibhav Tatwawadi : “निस्वार्थ प्रेमाचा खरा अर्थ…” ; मराठी अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर
Vaibhav Tatwawadi : या पोस्टमधून त्याने आजीसोबतचे जिव्हाळ्याचे नाते, तिच्या आठवणी आणि अखेरच्या काळात आई-वडिलांनी घेतलेली तिची काळजी याबद्दल मन मोकळे केले आहे.

Vaibhav Tatwawadi : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता वैभव तत्त्ववादी याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वैभवच्या आजीचे निधन झाले असून, अभिनेत्याने सोशल मीडियावर आजीच्या आठवणीत एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने आजीसोबतचे जिव्हाळ्याचे नाते, तिच्या आठवणी आणि अखेरच्या काळात आई-वडिलांनी घेतलेली तिची काळजी याबद्दल मन मोकळे केले आहे.
आपण तिचा नातू असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे वैभवने पोस्टमध्ये म्हटले आहे. आजीच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करताना तो म्हणतो, “एखाद्या खोलीत प्रवेश करताच सर्वांना आपलेसे करून घेण्याची तुझी ती कला पाहून मला नेहमीच आश्चर्य वाटायचे. तू माझी आजी होतीस, हे माझे खूप मोठे भाग्य आहे.”
“तू म्हणजे सुसंस्कृतपणा आणि प्रसन्नतेचं मूर्तिमंत रूप होतीस”
आजीच्या आठवणींना उजाळा देताना वैभवने तिच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले. “तू म्हणजे साक्षात सुसंस्कृतपणा आणि प्रसन्नतेचे मूर्तिमंत रूप होतीस,” असे त्याने म्हटले आहे. आजीच्या निधनापूर्वीचा अनुभवही वैभवने पोस्टमध्ये सांगितला. “नागपूरला उतरताना पहिल्यांदाच मला मनावर खूप जड ओझे जाणवले. काही तासांपूर्वी व्हिडिओ कॉलवर तू दिलेला निरोप ऐकून मला जाणीव झाली की, तू लवकरच हा देह सोडणार आहेस. हे सत्य स्वीकारण्याची वेळ आली आहे आणि ते वास्तव स्वीकारणे खरोखरच खूप कठीण आहे,” अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
View this post on Instagram
आई-वडिलांनी शेवटपर्यंत घेतली आजीची काळजी
आजच्या काळात वृद्ध आई-वडिलांच्या परिस्थितीवरही वैभवने आपल्या पोस्टमधून भाष्य केले. अनेक वृद्धांना त्यांच्या मुलांकडून अपेक्षित आधार मिळत नसल्याचे त्याने नमूद केले. “आजच्या जगात जिथे लोक वृद्ध माणसांना सर्रास वाऱ्यावर सोडतात, तिथे तुला मात्र एक अद्भुत मुलगा आणि सून लाभले. ते प्रत्येक दिवशी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले; अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. जेव्हा आई तुझ्या शेजारी बसून भगवद्गीतेचे श्लोक म्हणत होती.”
“निरोप घेते, आजी…”
आजीला अखेरचा निरोप देताना वैभवने लिहिले, “डोळ्यांत पाणी आणून हे सांगणे कठीण आहे, पण निरोप घेते, आजी. आणि निस्वार्थ प्रेमाचा खरा अर्थ मला समजावून दिल्याबद्दल तुझे खूप खूप आभार.” वैभवच्या या भावूक पोस्टनंतर त्याचे चाहते आणि मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकार त्याच्या आजीला श्रद्धांजली अर्पण करत असून, या दुःखाच्या प्रसंगी आपल्या संवेदना व्यक्त करत आहेत.
वैभव तत्त्ववादीच्या आगामी प्रोजेक्ट्सचीही चर्चा
दरम्यान, वैभव तत्त्ववादीने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट तसेच वेबसीरिजमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. ‘मेड इन इंडिया: अ टायटन स्टोरी’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. आता तो पूजा सावंतसोबत ‘भेटली तू पुन्हा २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.





