जमावात सामील झालेल्या तिघांना 13 वर्षांनी दंडाची शिक्षा

न्यायालयाने सुनावला प्रत्येकी 3 हजार रुपये दंड
पुणे : बेकायदेशीर जमावात सामील झालेल्या तिघांना तब्बल 13 वर्षांनी प्रत्येकी 3 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.आर. पाटील यांनी हा आदेश दिला आहे.
दंड न भरल्यास तिघांना एक महिना कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. किरण जगन्नाथ अंबवले, पोपट भागवत कोईले आणि भिमराव मरिप्पा नाटेकर अशी शिक्षा झालेल्या तिघांची नावे आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अनंत चौधरी यांनी काम पाहिले.
त्यांनी पाच साक्षीदार तपासले. घडलेल्या घटनेबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे. स्वारगेट पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक डी.एम.साठे यांनी या प्रकरणाचा तपास केला. 5 ऑगस्ट 2006 रोजी सॅलिसबरी पार्क येथील एका बंगल्यात ही घटना घडली.
आरोपी आणि इतर अनोळखी व्यक्ती संगणमत करून अचानकपणे आरडा-ओरडा करत फिर्यादींच्या बंगल्याच्या परिसरात घुसले. फिर्यादी, त्यांच्या मुलीला टिकावासारख्या हत्याराचा धाक दाखविला.
फिर्यादी, मुलीला धक्काबुक्कीचे केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर न्यायालयाने बेकायदेशीर जमावात सामील झाल्याच्या कलमानुसार ही शिक्षा सुनावली





