Pune District : भोर-कापूरव्होळ रस्त्याशेजारील वृक्ष पाण्याविना जळू लागली

भाटघर : भोर-कापूरव्होळ रस्ता रुंदीकरण कामाच्या वेळी रस्त्याच्या शेजारील वृक्षे कापावी लागली. सद्यस्थितीला कापूरव्होळ ते सांगवीपर्यंत दुतर्फी रस्त्याचे काम झाले असल्याने संबंधित ठेकेदाराने ४ ते ५ फूट उंचीच्या वृक्षांची लागवड केली. परंतु या वृक्षांच्या रोपांना पाणी न दिल्याने ही वृक्षे जळू लागली आहेत. यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
कापूरव्होळ-भोर यादरम्यान रस्त्याच्या शेजारी मोठे जुने वृक्ष होते. यामुळे रस्त्याचा परिसर निसर्गरम्य दिसत होता. वृक्षांमुळे या ठिकाणी पर्यावरण अनुकूल वातावरण होते. परंतु रस्ता रुंदीकरणाचे काम करताना ही वृक्ष तोडावी लागली. यामुळे रस्त्याचा परिसर भकास दिसू लागला आहे.
संबंधित ठेकेदाराने याची दखल घेत तीन महिन्यांपूर्वी रस्त्याचे दुतर्फा काम झालेल्या ठिकाणी वृक्ष लागवड केली होती. परंतु या वृक्षांना पाणी न दिल्याने काही वृक्ष जळू लागली आहेत. तर बरचशी वृक्षे अजून जीवित आहेत. संबंधित ठेकेदाराने याची दखल घेत वृक्षांना पाणी दिल्यास ही वृक्ष पुन्हा जोमाने डुलू लागतील.
भोर तालुक्यात भाटघर धरण, निरा देवघर धरण, रायरेश्वर पठार, रोहिडा किल्ला असून तालुक्यात निसर्गरम्य परिसर असल्याने पर्यटक पर्यटनासाठी या ठिकाणी येत असतात. पुणे-सातारा महामार्ग सोडून भोरच्या दिशेने जाताना रस्त्याच्या शेजारी निसर्गरम्य मोठमोठी वृक्षे पूर्वी दिसत होती. परंतु ही वृक्षे गायब झाल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. तर, लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था केल्यास उर्वरित वृक्षांना जीवदान मिळेल. जळालेल्या वृक्षांच्या ठिकाणी नवीन वृक्षांची रोपे लावावीत, अशी मागणी पर्यावरण प्रेमी करीत आहेत.
सदर रस्त्याच्या शेजारील वृक्ष रोपांना लवकरात लवकर पाणी देण्यासंदर्भात आम्ही संबंधित ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत. सदरची वृक्षरोपे जीवित राहावीत व पुन्हा हा रस्ता निसर्गरम्य दिसावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
– योगेश मेटेकर, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, भोर





