चिंताजनक.! ऑगस्ट-ऑक्टोबरदरम्यान करोनाची तिसरी लाट शक्य

पुणे -पुण्याचे हवामान आणि भौगोलिक स्थिती पाहता तिसरी लाट ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान येईल, असा इशारा “पुणे कोविड टास्क फोर्स’चे अध्यक्ष डॉ. दिलीप कदम यांनी रविवारी व्यक्त केली.
“इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए) पुणे शाखेतर्फे रविवारी वेबिनारचे अयोजन करण्यात आले होते. यात “कोविड आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या गुंतागुंतीच्या समस्या’ हा चर्चासत्राचा विषय होता.
यात महापौर मुरलीधर मोहोळ, पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे हे प्रमुख अतिथी होते. याशिवाय संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. भरत पुरंदरे, डॉ. संजय पाटील आदी उपस्थित होते.
“काही प्राण्यांमधून हा विषाणू मनुष्यात संक्रमित झाला असावा, असा अंदाज आहे. सध्या यूके, दक्षिण आफ्रिका आणि इंडियन असे तीन महत्त्वाचे व्हेरियंट आहेत.
हा आजार दोन ते तीन वर्षे जाणार नाही. तिसरी लाट येताच कामा नये, यासाठी एकजूट दाखवू,’ असे आवाहन डॉ. पुरंदरे यांनी केले. “कान, नाक, घसा’ तज्ज्ञ डॉ. कैलासनाथ संत यांनी “म्युकरमायकोसिस’ संसर्गाबाबत माहिती दिली.
“पुणे हे राज्यात निर्बंध लादले जाणारे पहिले शहर होते. या काळात पोलिसांचेही कौतुकही झाले. दुसऱ्या लाटेत निर्बंध लादले नसते, तर पुण्यातील रुग्णसंख्या दिवसाला 8 ते दहा हजारांवर गेली असती,’ असे डॉ. शिसवे म्हणाले.
संकटकाळात आम्ही एक होतो, हे पुण्याने दाखवून दिले. आता आपण करोनाच दुसऱ्या लाटेतून बाहेर पडत आहोत. पहिल्या लाटेत प्रशासनाला यंत्रणा उभी करायला वेळच मिळाला नाही, त्यामुळे व्यवस्थेवर ताण आला होता. तिसरी लाट आली, तरी आपली सर्व यंत्रणा तयार आहे.
– मुरलीधर मोहोळ, महापौर




