Bhuinj News : ‘लेडी सिंघम’चा धडाका; पोलिस उपअधीक्षक पूनम झगडे यांच्या कारवाईने अवैध धंद्याना लगाम
Bhuinj News :पोलिस उपअधीक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर झगडे यांनी परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेत पोलिस यंत्रणेला अधिक सक्रिय केले आहे.

भुईंज : पोलिस उपअधीक्षक म्हणून भुईंज पोलीस ठाण्यात नियुक्ती झाल्यानंतर पूनम झगडे यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच गुन्हेगारी प्रवृत्तींवर प्रभावीपणे कारवाई करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी विविध गुन्ह्यांचा तपास करून अनेक गुन्हे उघडकीस आणले असून, अवैध धंद्यांविरोधातही धडक मोहीम राबविण्यात आली आहे. या कारवायांमुळे गुन्हेगारीप्रवृत्तींच्या व्यक्तींमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला आहे.
पोलिस उपअधीक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर झगडे यांनी परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेत पोलिस यंत्रणेला अधिक सक्रिय केले आहे. गुन्हेगारी घटनांवर बारकाईने लक्ष ठेवतानाच संशयास्पद हालचाली, अवैध व्यवसाय आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची भूमिका त्यांनी घेतली.
भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या विविध गुन्ह्यांच्या तपासाला गती देत पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली. गुन्ह्यांचा तपास करताना उपलब्ध माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना यश आले. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिस प्रशासनाबाबत विश्वासाचे वातावरण निर्माण होण्यास मदत झाली आहे.
परिसरातील अवैध धंद्यांवरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन सुरू असलेल्या गैरप्रकारांवर कारवाई करण्याची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये पोलिस कारवाईची धास्ती निर्माण झाली आहे.
नागरिकांची सुरक्षितता आणि परिसरातील शांतता अबाधित ठेवणे हे पोलिस प्रशासनाचे प्रमुख कर्तव्य असून, त्यासाठी पोलिस यंत्रणा सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे. गुन्हेगारीला कोणत्याही प्रकारे थारा दिला जाणार नाही. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक पुनम झगडे यांनी घेतली आहे.
आगामी काळातही भुईंज परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलिसांची गस्त, संशयित हालचालींवर लक्ष आणि अवैध धंद्यांविरोधातील कारवाई यावर भर दिला जाणार आहे. “नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार निदर्शनास आल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन सदैव तत्पर राहील,” असा विश्वास परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक पुनम झगडे यांनी व्यक्त केला.



