Gokul Gite : डाव पलटला! अपक्ष उमेदवाराने मारली बाजी; संकटमोचक महाजनांच्या प्रयत्नांना अपयश, कोण आहेत गोकुळ गीते?
Gokul Gite : मतमोजणीच्या दिवशी सुरूवातीपासूनच गोकुळ गीते यांनी आघाडी घेतली होती. मतमोजणी केंद्राबाहेर त्यांच्या समर्थकांनी विजयाचा जल्लोष करण्यास सुरुवात केली.

Gokul Gite : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १७ जागांसाठी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीने दमदार कामगिरी करत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीतील १७ पैकी तब्बल १६ जागांवर महायुती समर्थित उमेदवारांनी विजय मिळवत विरोधकांना मोठा धक्का दिला.
भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या युतीने बहुतेक मतदारसंघांत एकहाती विजय संपादन केला. मात्र, नाशिक मतदारसंघात अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करत अनपेक्षित विजय मिळवला. त्यामुळे राज्यभर महायुतीचा विजयाचा जल्लोष सुरू असतानाच नाशिकचा निकाल विशेष चर्चेचा ठरला.
खरंतर नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक मोठ्या राजकीय घडामोडींनी लक्ष वेधून घेणारी ठरली. या निवडणुकीत गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी, यासाठी बड्या नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र, प्रत्यक्षात चित्र संपूर्णपणे पलटले आणि अपक्ष उमेदवार गोकुळे गिते यांनी बाजी मारत विजयाचा गुलाल उधळला. त्यांना ६०५ वैध मतांपैकी ३५७ मते मिळली. तर शिवसेना शिंदे गटाचे पराभूत उमेदवार नरेंद्र दराडे दराडे यांना २४८ मते मिळवता आली. हा निकाल म्हणजे त्यांच्यासाठी मोठा धक्का देणारा ठरला.
कोण आहेत गोकुळ गीते? (Gokul Gite)
या निवडणुकीत निवडून आलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्या नावाची चर्चा राज्यभरात होत आहे. गोकुळ गीते हे नाशिक महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांचे बंधू आहेत. गीते यांच्या संपूर्ण राजकीय वाटचालीत गोकुळ गीते यांचा पडद्यामागून मोठा हातभार राहिला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत गणेश गीते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार होते. या संपूर्ण निवडणुकीचे नियोजन गोकुळ गीते यांनी पाहिले होते. पडद्यामागून अनेक राजकीय डावपेच त्यांच्याकडून आखण्यात आले होते. तीच रणनिती त्यांनी आताच्या निवडणुकीत केली आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
हेही वाचा : Pune Crime News: पुण्यात बिश्नोई टोळीचा पुन्हा धुमाकूळ; खंडणीच्या धमकीनंतर उद्योगावर गोळीबार
विजयानंतर गोकुळे गीते काय म्हणाले? (Gokul Gite)
मतमोजणीच्या दिवशी सुरूवातीपासूनच गोकुळ गीते यांनी आघाडी घेतली होती. मतमोजणी केंद्राबाहेर त्यांच्या समर्थकांनी विजयाचा जल्लोष करण्यास सुरुवात केली. अखेर त्यांचाच विजय झाला. विजय झाल्यानंतर या निवडणुकीत मी प्रचार थांबवला होता. कुणालाही पाठिंबा दिला नव्हता. निवडणूक काळात मी घरात बसून होतो. परंतु, कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतली. शिवसेनेच्या उमेदवाराविषयी नाराजी होती. त्यामुळे मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्यांचा विश्वास सार्थ ठरवू, अशी प्रतिक्रिया गोकुळे गीते यांनी विजयी झाल्यानंतर दिली.
श्रीकांत शिंदेंकडून मोठी घोषणा
नाशिकचा निकाल राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. गोकुळ गीते यांच्या विजयानंतर राजकीय हालचाली वाढल्या. मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेतून खासदार श्रीकांत शिंदे यांनी गोकुळे गीते शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम पाहतील, अशी मोठी घोषणा केली.






