Diwali Gifts: दिवाळीत भेटवस्तूंच्या देवाणघेवाणीतून नात्यांचा गोडवा!
Diwali Gifts: मिठाईचे बॉक्स, ड्रायफ्रूट्स अन् आकर्षक गिफ्ट पॅकला पसंती

पिंपरी – दिवाळी सणाच्या निमित्ताने नातेवाइक, मित्रपरिवार, शेजारी आणि सहकाऱ्यांना भेटून शुभेच्छा देण्याची तसेच भेटवस्तूंची देवाणघेवाण करण्याची परंपरा आजही कायम आहे.
बदलत्या काळानुसार भेटवस्तूंचे स्वरूप बदलले असले, तरी त्यामागील प्रेम आणि जिव्हाळा मात्र कायम आहे. यंदाच्या दिवाळीतही मिठाईचे आकर्षक बॉक्स, ड्रायफ्रूट्स, चॉकलेट पॅक आणि विविध गिफ्ट हॅम्पर्सना नागरिकांकडून पसंती दिली जात आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील मिठाईची दुकाने, गिफ्ट शॉप्स आणि विविध वस्तूंच्या विक्री केंद्रांमध्ये लगबग वाढली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानदारांनी आकर्षक पॅकिंगमध्ये मिठाई आणि भेटवस्तूंचे विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
पारंपरिक पेढे, लाडू, काजू कतली, बर्फी यांसह चॉकलेट्स आणि ड्रायफ्रूट्सच्या आकर्षक बॉक्सची मांडणी दुकानांमध्ये करण्यात आली आहे. पूर्वी दिवाळीच्या फराळाचा डबा देण्याची परंपरा अधिक प्रचलित होती. घरगुती चकली, चिवडा, लाडू, करंजी आणि शंकरपाळे नातेवाइकांना तसेच शेजाऱ्यांना देऊन सणाचा आनंद वाटला जात असे.
आजही अनेक कुटुंबांकडून ही परंपरा जपली जात आहे. मात्र, त्यासोबतच तयार फराळाचे आकर्षक पॅक, मिठाईचे बॉक्स आणि ड्रायफ्रूट्सच्या भेटवस्तू देण्याचे प्रमाणही वाढले आहे. नोकरदार वर्ग, व्यावसायिक आणि विविध कंपन्यांकडूनही दिवाळीच्या निमित्ताने भेटवस्तू देण्याची तयारी केली जात आहे. काही कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना मिठाईचे बॉक्स, गिफ्ट व्हाउचर किंवा विशेष भेटवस्तू दिल्या जातात.
व्यावसायिकांकडून ग्राहक आणि व्यावसायिक भागीदारांना शुभेच्छांसह भेटवस्तू देण्याची परंपराही जोपासली जात आहे. विशेष म्हणजे, भेटवस्तूंच्या माध्यमातून नात्यांमधील संवाद आणि जिव्हाळा वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
धावपळीच्या जीवनात प्रत्यक्ष भेटणे शक्य नसले, तरी मिठाईचा बॉक्स किंवा छोटीशी भेट पाठवून शुभेच्छा देण्याकडे अनेकांचा कल आहे. त्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने भेटवस्तूंची देवाणघेवाण हा केवळ औपचारिक व्यवहार न राहता नात्यांमधील गोडवा जपण्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.





