प्रभात वृत्तसेवा कामशेत – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण जाहीर होताच मावळ तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. विविध पक्षांतील इच्छुक उमेदवारांनी प्रचारयुद्धाची अनौपचारिक सुरुवात केली असून, त्यासाठी मतदारांना आकर्षित करण्याच्या नव्या पद्धती अवलंबल्या जात आहेत.दिवाळीच्या सणाचा मुहूर्त साधत अनेक इच्छुकांनी घरपोच भेटवस्तूंचा वर्षाव सुरू केला आहे. काही शुभेच्छापत्रांवर तर उमेदवार कोणत्या गटातून निवडणूक लढवणार आहे, हेही थेट नमूद केलेले आहे. काही उमेदवारांनी विशेष टीम तयार करून घराघरात संपर्क मोहीम सुरू केली आहे. नव्या प्रभागरचनेमुळे प्रत्येक प्रभागाची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळे सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.कामशेत, तळेगाव, निगडे, नायगाव, शिरगाव आणि आजूबाजूच्या गावांमध्ये सध्या प्रत्येक घरात उटणे, पणत्या, आकाशकंदील, शुभेच्छापत्रे अशा भेटवस्तू उमेदवारांकडून पोहोचवल्या जात आहेत. विशेष म्हणजे या भेटवस्तूंसोबत उमेदवाराचे शुभेच्छापत्र आणि परिचयपत्रकही जोडलेले असते. त्यात गणातील धडाडीचा कार्यकर्ता, आपल्या सेवेत सदैव तत्पर समाजसेवक अशा विशेषणांनी सजवलेले मजकूर देखील छापले जात आहेत.दिवाळी हा आनंदाचा सण असला तरी, या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांचीही मांडणी मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. शहरात सध्या कोणाची भेट अधिक आकर्षक? आणि कोणाचे शुभेच्छापत्र अधिक प्रभावी? या चर्चांनी राजकीय रंग चढवला आहे. राजकीय तापमान हळूहळू वाढत असताना मतदार मात्र शांतपणे या सगळ्या घडामोडींचा आढावा घेत आहेत. सोशल मीडियावरही शुभेच्छांचा पाऊस.. भेटवस्तूंसोबतच व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियावर शुभेच्छा संदेशांचा वर्षाव सुरू झाला आहे. काही इच्छुकांनी आकर्षक फ्लेक्स बॅनर, डिजिटल कार्ड, आणि व्हिडिओ शुभेच्छा तयार करून त्याद्वारे स्वतःचे समाजकारण मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर लावलेले दिवाळीच्या शुभेच्छांचे फलकही राजकीय रंगात नटलेले दिसत आहेत. दिवाळीनिमीत्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.. सणासुदीच्या काळात मतदारांशी संबंध दृढ करण्यासाठी काही ठिकाणी लहानमोठे कार्यक्रम जसे की, दिवाळी पहाट आणि गाण्यांच्या मैफिलीसोबतच सामूहिक फराळाचे आयोजन करण्यात येत आहेत. या कार्यक्रमांमध्ये उमेदवार थेट नागरिकांशी संवाद साधत असून आपले सामाजिक योगदान अधोरेखित करत आहेत. बचतगटांना आणि स्थानिकांना मिळतेय काम.. घरोघरी संपर्क साधून दिवाळी भेटी पोहोचवण्याचे काम कुरिअर कंपन्यांसोबतच बचतगटांनाही देण्यात आले आहे. या कामाचे दोन टप्पे केले जातात. भेट देण्याच्या वस्तूंचे पॅकिंगचे काम मुख्यतः बचतगटाला दिले जाते, तर घरोघरी जाऊन वाटपाचे काम बचतगटाला किंवा गणांची योग्य माहिती असलेल्या स्थानिकांना दिले जाते. पत्रके वाटणे, कार्यक्रमांची माहिती पोहोचवणे या कामांसाठी ३०० ते ५०० रुपये रोज या दराने कामाचे पैसे दिले जात आहेत.