दंतेवाडा – नक्षलवाद्यांच्या अनेक घातपातांच्या कारवायांमध्ये सक्रीय सहभाग असलेला व अनेक दिवसांपासून पोलिसांना हवा असणाऱ्या नक्षलींच्या मुचकी बुद्रया डेप्युटी कमांडरने रविवारी छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
मुचकी बुद्र उर्फ नरेश (32) असे त्याचे नाव असून, त्याच्यावर तब्बल आठ लाख रूपयांचा इनाम होता. त्याने पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांच्यासमोर दंतेवाडा येथे शरणागती पत्कारली. तो दंतेवाडामधील मलंगीर भागात कार्यरत असलेल्या नक्षलवाद्यांच्या लष्करी तुकडी क्रमांक 24 चा तो डेप्युटी कमांडर होता.
अनेक नक्षली हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता. यात 2010 मध्ये कॉंग्रेस नेते अवधेश गौतम यांच्यावर नकुलनार गावातील निवासस्थानी झालेला नक्षली हल्ला, ज्यामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू तर एक नक्षलवादी ठार झाला होता. तसेच, 2012 मध्ये सीआयएसएफच्या पथकावर किरंदूलमध्ये झालेला हल्ला, ज्यामध्ये सहा जवान आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. यांचा प्रामुख्याने समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पल्लव यांनी दिली.