जी 20 च्या यशामुळेच जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी वाढली ! संरक्षण तज्ज्ञांचे निरीक्षण

नवी दिल्ली – जम्मू काश्मीरमध्ये अलीकडच्या काळात अचानक सीमेपलीकडून घुसखोरीमध्ये वाढ झाली आहे. सुरक्षा दलांनी गेल्या दोन महिन्यांमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या 20 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ही घुसखोरी काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या “जी-20’च्या बैठकांना मिळालेल्या मोठ्या यशामुळे पाकिस्तानला आलेल्या वैफल्यामुळेच वाढली असल्याचे मत संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
या वर्षी मे महिन्यात अचानक घुसखोरी वाढली. त्यानंतर जून आणि जुलै महिन्यातही घुसखोरीचे हे सत्र कायम राहिले होते. जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशामध्ये दहशतवादी कारवाया वाढवण्यासाठी पाकिस्तानने आपले प्रयत्न पुन्हा वाढवले आहेत. मात्र सुरक्षा दले आणि पोलिसांनी हे प्रयत्न यशस्वीपणे हाणून पाडले आहेत. यामुळे दहशतवादी कारवाया घटल्या आणि दहशतवाद्यांना स्थानिक पातळीवरून मिळणारा पाठिंबाही कमी झाला, असे जम्मू-काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक कुलदीप खोडा यांनी सांगितले.
काश्मीर खोऱ्यामध्ये 22 ते 24 मे दरम्यान “जी 20′ ची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मोठा प्रतिसाद मिळाला आणि बैठकीचे आयोजन यशस्वी झाले. या बैठकीला आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक अतिथी उपस्थित राहिले होते. ही बैठक उधळून लावण्यात पाक घुसखोरांना अपयश आले. त्या वैफल्यातूनच “एलओसी’वर नव्याने घुसखोरी केली जाऊ लागली आहे, असे संरक्षण तज्ज्ञ कॅप्टन अनिल गौर यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानला काश्मीरमध्ये जी-20 बैठकीचे आयोजन कधीच होऊ द्यायचे नव्हते. त्याच्या यशामुळे, पाकिस्तान खूप निराश झाला आहे. त्यामुळेच जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचे प्रमाण वाढवले, असल्याचे गौर म्हणाले. “जी-20′ च्या बैठकीच्या काळामध्ये ताबा रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरून 15 वेळा घुसखोरीचे प्रयत्न झाले होते.





