Satara: गणेशभक्तांच्या गर्दीने फुलुन गेले साताऱ्यातील रस्ते
Satara घरगुती गणरायांचे विसर्जन झाल्यानंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या ‘श्रीं’च्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये महिलांसह लहान मुलांचाही मोठा सहभाग दिसत असून, त्याचा लाभ परिसरातील खाद्यपदार्थ, खेळणी, फुगे आणि विविध वस्तूंच्या विक्रेत्यांना होत आहे.

Satara: गणेशोत्सवाच्या अंतिम टप्प्यात शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे गणेशभक्तांच्या आकर्षणाचे केंद्र ठरू लागल्याने शहरातील रस्ते गर्दीने फुलू लागले आहेत. केवळ भव्य सजावट आणि विद्युत रोषणाईवर भर न देता मंडळांनी ऐतिहासिक, पौराणिक कथा, अध्यात्म, सामाजिक प्रश्न आणि जनजागृती यांचा मेळ घालत जिवंत देखावे साकारले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमापासून महिलांचा सन्मान, मराठी शाळांची सद्यस्थिती, अन्नभेसळ अशा समकालीन विषयांपर्यंत विविध प्रश्नांना देखाव्यांतून वाचा फोडण्यात आली आहे.
घरगुती गणरायांचे विसर्जन झाल्यानंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या ‘श्रीं’च्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये महिलांसह लहान मुलांचाही मोठा सहभाग दिसत असून, त्याचा लाभ परिसरातील खाद्यपदार्थ, खेळणी, फुगे आणि विविध वस्तूंच्या विक्रेत्यांना होत आहे. पावसाच्या रिमझिम असूनही गणेश मंडळांच्या परिसरात खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि छोट्या व्यावसायिकांची दुकाने सजली आहेत.
मारवाडी भुवन गणेशोत्सव मंडळाचा ‘राजमाता जिजाऊंचे धैर्य आणि शिवबाची बुद्धिमत्ता’, सोन्या मारुती गणेशोत्सव मंडळाचा ‘मराठी शाळा जगली पाहिजे’, बालविकास गणेशोत्सव मंडळाने ‘तिरुपती बालाजी’ हे देखावे गर्दीच्या आकर्षणाचे केद्रबिंदू ठरले आहेत. अन्नभेसळीचा गंभीर प्रश्न अजिंक्य गणेशोत्सव मंडळाने देखाव्यातून मांडला आहे. श्री गजराज गणेशोत्सव मंडळाने सरसेनापती प्रतापराव गुजर आणि ‘वेडात वीर मराठे दौडले सात’ या ऐतिहासिक प्रसंगावर आधारित जिवंत देखावा साकारला आहे. समर्थ गणेशोत्सव मंडळाने ‘महिषासुरमर्दिनी’ देखाव्यातून देवीची कथा सादर केली आहे. श्रीमंत बालस्फूर्ती गणेशोत्सव मंडळाने छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य आणि पराक्रम उलगडणारा देखावा उभारला आहे.
शिवतीर्थ येथील गणेशोत्सव मंडळाने डिजिटल माध्यमातून दररोज वेगवेगळ्या देवतांची माहिती सादर केली आहे. सह्याद्रीचा राजा गणेश मंडळाने केदारनाथाच्या माध्यमातून बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडविणारा देखावा साकारला आहे. अन्य मंडळांनीही पौराणिक मंदिरे, धार्मिक कथा आणि विविध ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित देखावे उभारुन परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून टाकला आहे.
गणेशोत्सवातील हे देखावे केवळ मनोरंजन न राहता इतिहासाची ओळख, सामाजिक प्रश्नांवर भाष्य आणि नव्या पिढीला संस्कृतीची माहिती देण्याचे माध्यम ठरत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत देखावे पाहण्यासाठी शहरातील विविध भागांत भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.





