Satara: पेढ्याचा भैरोबा परिसरातील कामाच्या चौकशीची मागणी, ठाकरे गट आक्रमक; दुर्लक्ष झाल्यास उपोषणाचा इशारा
Satara सातारा शहराच्या ऐतिहासिक वारशाचा भाग असलेल्या गडकर आळी या परिसरातील नागरिकांच्या श्रद्धेशी श्री पेढ्याचा भैरोबा देवस्थानाची घट्ट नाळ जोडलेली आहे. त्यामुळे कोणतेही काम करण्यापूर्वी स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेणे आवश्यक होते. मात्र, संबंधित काम करताना स्थानिकांचा अभिप्राय घेण्यात आला नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

Satara: गडकर आळीचे ग्रामदैवत श्री पेढ्याचा भैरोबा देवस्थान परिसरातील कथित निकृष्ट व नियोजनशून्य कामावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने प्रशासनाला धारेवर धरले आहे. नैसर्गिक मुरमाच्या पाऊलवाटा हटवून करण्यात आलेल्या काँक्रिटीकरणामुळे देवस्थानाच्या परिसराचे पावित्र्य आणि सुरक्षितता धोक्यात आल्याचा आरोप करीत या संपूर्ण कामाची चौकशी करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
सातारा शहराच्या ऐतिहासिक वारशाचा भाग असलेल्या गडकर आळी या परिसरातील नागरिकांच्या श्रद्धेशी श्री पेढ्याचा भैरोबा देवस्थानाची घट्ट नाळ जोडलेली आहे. त्यामुळे कोणतेही काम करण्यापूर्वी स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेणे आवश्यक होते. मात्र, संबंधित काम करताना स्थानिकांचा अभिप्राय घेण्यात आला नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
वॉकिंग ट्रॅकच्या नावाखाली काँक्रिटीकरण करण्याची आवश्यकता काय होती? कामासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला होता का? कामाचा दर्जा तपासला कोणी? असे सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. या कामानंतर परिसरात प्रेमी युगुलांचा तसेच अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या प्रवृत्तींचा वावर वाढल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. या प्रकरणाची तातडीने स्वतंत्र चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास ग्रामस्थांच्यावतीने उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला. शिवसेना शहरप्रमुख प्रणव वासुदेव सावंत यांच्यासह दत्तात्रय साळुंखे, सुभाष साळुंखे, ओंकार महांगडे, शिवेंद्र ताटे, बाबासाहेब सावंत, शरद कदम, विश्वास साळुंखे, उमेश साळुंखे, संतोष जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.





