Indapur News : राज्याने ऋषितुल्य नेतृत्व गमावले
Indapur News : गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले.

इंदापूर : शिक्षण, सहकार, आरोग्य, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटविणारे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राने जुन्या पिढीतील एक ऋषितुल्य नेतृत्व गमावले आहे. त्यांचे बहुआयामी योगदान सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावे असे असून, त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे, अशा शब्दांत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्लीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, डॉ. डी. वाय. पाटील यांनी कोल्हापूरचे महापौर आणि पन्हाळ्याचे आमदार म्हणून लोकाभिमुख कारभार केला. त्यानंतर शिक्षण क्षेत्रात त्यांनी उभारलेले कार्य ग्रामीण भागापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले. गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळाली.
शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान महाराष्ट्र आणि देश कधीही विसरणार नाही. समाजातील वंचित घटकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचा त्यांचा ध्यास अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील,” असे गौरवोद्गारही पाटील यांनी काढले.
हर्षवर्धन पाटील यांनी वैयक्तिक आठवणींना उजाळा देत सांगितले, माझे काका कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्याशी दादांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. मी कोल्हापूर जिल्ह्याचा दहा वर्षे पालकमंत्री असताना त्यांची अनेकदा भेट झाली. प्रत्येक भेटीत त्यांच्या अनुभवसंपन्न मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा, दूरदृष्टी आणि समाजहिताची तळमळ कायम स्मरणात राहील.





