State Budget Session : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 23 फेब्रुवारीपासून सुरूवात; 6 मार्चला अर्थसंकल्प मांडला जाणार
State Budget Session : राज्याचा अर्थसंकल्प ६ मार्च रोजी सादर केला जाणार असून, हे अधिवेशन २५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.

State Budget Session : नुकताच केंद्राने देशाचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आता महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २३ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प ६ मार्च रोजी सादर केला जाणार असून, हे अधिवेशन २५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या अकाली निधानामुळे अर्थसंकल्प राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करतील.
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाची रूपरेषा निश्चित करण्यात आली.
त्यानुसार राज्य विधिमंडळाच्या मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सोमवार, २३ फेब्रुवारी ते बुधवार, २५ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे. ६ मार्च रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांमध्ये अजित पवार यांच्या निधानाचा शोक प्रस्ताव मांडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.अधिवेशन काळात शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरूच असणार आहे. मात्र, सोमवारी २ मार्च रोजी होळी आणि ३ मार्च रोजी धूलिंवदन असल्याकारणाने कामकाज होणार नाही. १९ मार्चला गुढीपाडव्याची सार्वजनिक सुट्टी असल्याने या दिवशी कामकाज होणार नाही. २० मार्चला देखील विधिमंडळाचे कामकाज होणार नाही.
या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री छगन भुजबळ व इतर मान्यवर उपस्थित होते.
हे असतील महत्वाचे चर्चेचे विषय
संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२६ हे ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. यावर चर्चा होणार.
जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक ९ मार्च रोजी दोन्ही सभागृहात चर्चा होणार
मराठी भाषा गौरव दिननिमित्त चर्चा होणार
सभागृहातून निवृत्त होणाऱ्या सदस्यांचा निरोप समारंभ आयोजित होणार






