पुणे जिल्हा | पुरंदरच्या दक्षिण पूर्व भागाला अवकाळीने झोडपले

नीरा, (वार्ताहर) – पुरंदर तालुक्याच्या दक्षिण पूर्व भागात गुरुवारी दुपारी वादळीवार्यासह जोराचा पाऊस झाला. वादळीवार्यामुळे गुळुंचे गावच्या हद्दीतील जवसारमळा येथील प्रशांत शिवाजी निगडे यांच्या राहत्या घराचे पत्रे उडून गेले. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
गुळूंचे व परिसरात वादळीवार्यासह गारांच्या पावसाने दमदार हजेरी लावली. वळवाच्या या पावसाने परिसरात थंडावा निर्माण झाला आहे. गेली दोन महिने वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या लोकांना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास आलेल्या पावसाने दिलासा मिळाला. गुळूंचे, कर्नलवाडी, राख परिसराला झोडपून काढले.
गुळूंचे, राख, कर्नलवाडी, जवसारमळा, फरांदे वस्ती, पांढरीची वस्ती, नेवसेवाडी, ब्राह्मणदरा आदि परिसरात दुपारी तीनच्या सुमारास विजेच्या कडकडाटात जोराचे वादळी वार्यासह झालेल्या दमदार पावसाने काही कळाकरता जनजीवन विस्कळीत झाले होते.
मागील वर्षी या परिसरात उन्हाळी पाऊस झालाच नव्हता. तसेच पावसाळ्यात ही पावसाचे प्रमाण सरासरीच्या तुलनेत चाळीस टक्के कमी होते. त्यामुळे आता पाणीपातळी खालावली आहे. यावर्षी उन्हाळी पावसाने वेळेत हजेरी लावल्याने शेतकरी आशावादी झाला आहे.
मागील शनिवारी व गुरुवारी (दि. 16) झालेल्या वादळी वार्याने जनावरांच्या गोठ्यावरील तसेच जुन्या घरांवरील कौलारू व पत्र्यांची छप्पर उडाली. तर काही शेतकर्यांनी टोमॅटोची नव्याने केलेल्या लागणीमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. गुळूंचे हद्दीतील जवसार मळा व पांढरीची वस्ती येथील संजय हणूमंत निगडे यांच्या घरावरील छप्पर उडाले. तर काही जुन्या घरांच्या भिंती ढासळत्या आहेत. वादळी वार्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता.
यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने मोठ्या कष्टाने ड्रिप करुन टोमॅटोची लागण केली आहे. या टोमॅटोच्या सरीमध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचल्याने पीकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.- भुषण निगडे, शेतकरी





