Soham Bandekar : बांदेकरांच्या घरात घुमणार सनई चौघड्यांचा सूर! कोण आहे होणारी सून?

Soham Bandekar : झी मराठी वाहिनीवरील होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लाडक्या वहिनींचे भाऊजी अर्थात आदेश बांदेकर आता सासरे होणार आहेत. बांधेकरांच्या घरात सनई चौघड्यांचा आवाज घुमणार आहे. आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांधेकर यांचा मुलगा अभिनेता सोहम बांदेकर याचं लग्न ठरल्याची बातमी समोर आली आहे. याबाबत राजश्री मराठी वाहिनीने वृत्त दिलं आहे.
यामुळे आता सोशल मीडियावर बांदेकरांच्या होणाऱ्या सुनबाई कोण आहेत याची चर्चा होत आहे. अशातच आता होणाऱ्या सुनबाईंचं नाव समोर आलं आहे. अभिनेत्री पूजा बिरारीसोबत सोहम बांदेकर लग्नबंधनात अडणार आहे. लवकरच या दोघांचा विवाह होणार असल्याचं बोललं जात आहे.
प्रसिद्ध मराठी अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपं म्हणून ओळखलं जातं. त्यांचा मुलगा सोहम बांदेकर हा देखील अभिनेता आहे. त्याने स्टार प्रवाह वाहिनीवर लोकप्रिय मालिका ‘नवे लक्ष्य’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
सोहम बांदेकरच्या लग्नाचं वृत्त राजश्री मराठीने दिलं आहे. याबाबत पोस्ट शेअर करण्यात आली असून या पोस्टमध्ये सोहम बांदेकर ‘येड लागलं प्रेमाचं’ फेम पूजा बिरारीसोबत लग्न करणार आहे, असं म्हटलं आहे. यामुळे सोहम आणि पूजा यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, अद्यापर्यंत आदेश बांदेकर किंवा सुचित्रा बांदेकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही.
होणाऱ्या सूनबाई कोण?
बांदेकर कुटुंबाच्या होणाऱ्या सूनबाईंचं नाव मराठमोळी अभिनेत्री पूजा बिरारी आहे. ती २९ वर्षांची असून साजणा या मालिकेतून तिला लोकप्रियता मिळाली. ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेमध्ये ती मंजरीची भूमिका साकारत आहे. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. पूजाला नृत्याचीही खूप आवड आहे.
हेही वाचा : मुंबईत पावसाचा जोर कायम; सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना WFHच्या सूचना





