Satara News : नवजातील अरण्यात भक्तीचा गजर! रामबाण तीर्थक्षेत्रावर रामनवमी उत्साहात साजरी

कोयनानगर : कोयना धरणाच्या कुशीत वसलेल्या नवजा गावाच्या सान्निध्यातील दाट अरण्यात वसलेले रामबाण तीर्थक्षेत्र रामनवमीच्या दिवशी भक्तिभावाने न्हालं होतं. प्रभू श्रीरामाच्या पौराणिक बाणांच्या खुणा जपणाऱ्या या जागी ग्रामस्थ, पर्यटक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्र येत श्रद्धेचं अनोखं दर्शन घडवलं. निसर्गाच्या कुशीत विसावलेलं हे तीर्थक्षेत्र म्हणजे फक्त पर्यटनस्थळ नव्हे, तर श्रद्धेचं आणि इतिहासाचं प्रतीक मानलं जातं. येथे असलेल्या एका मोठ्या दगडावर दोन बाणांच्या स्पष्ट खुणा आजही विद्यमान आहेत. स्थानिक आख्यायिकेनुसार प्रभू श्रीरामाने याच ठिकाणी बाण सोडले होते. म्हणूनच येथे दरवर्षी रामनवमीला विशेष पूजन होतं.
या वर्षीच्या रामनवमीसाठी ग्रामस्थांनी, स्थानिक शाळांमधील शिक्षक-विद्यार्थ्यांनी आणि पर्यटकांनी मिळून भक्तीमय वातावरण निर्माण केलं. सकाळी रामनामाच्या गजरात पूजा, आरती, नैवेद्य अर्पण करण्यात आले. रामजन्माचा प्रसंग मोठ्या उत्साहात साजरा झाला. विद्यार्थ्यांनी परिसरात स्वच्छता मोहीम राबवली आणि पर्यावरण संरक्षणाचे संदेश फलक झळकावले.
कार्यक्रमादरम्यान काही अभ्यासकांनी रामबाण क्षेत्राच्या ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्वावर संवाद साधला. रामायणाच्या कथा, कोयना खोऱ्याच्या सांस्कृतिक ओळखी, आणि निसर्गसंवर्धनाचं महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं. हा कार्यक्रम ग्रामस्थ, शिक्षक, पालक आणि स्वयंसेवकांच्या एकत्रित सहभागातून साकार झाला. एकत्र येण्याची आणि पावित्र्य अनुभवण्याची ही संधी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली. यावेळी रामबाण तीर्थक्षेत्राच्या संवर्धनासाठी भविष्यात विशेष उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.





