नोवाक जोकोवीचच्या माफीनंतरही ‘परिस्थिती जैसे थे’…

मेलबर्न – व्हिसासाठी सादर केलेली कागदपत्रे योग्य नव्हती, तसेच करोना पॉझिटिव्ह आल्यावरही युरोपात एका कार्यक्रमाला हजेरी लावल्याबद्दल सर्बियाचा अव्वल मानंकित टेनिसपटू नोवाक जोकोवीचने माफी मागितली आहे. मात्र, त्याच्या या माफीनाम्यानंतरही त्याला पुढील आठवड्यात सुरू होत असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेत सहभागी होता येणार का, याबाबत संभ्रम अद्याप कायम राहिला आहे.
ऑस्ट्रेलिया सरकारने व्हिसा रद्द केल्यामुळे जोकोवीचने न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने व्हिसा रद्द केल्याचा निर्णय फेटाळून लावत जोकोवीचला दिलासा दिला. मात्र, जोकोवीच 16 डिसेंबर रोजी करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर 17 डिसेंबरला एका सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित का राहिला, असा सवालही सरकारने केला होता.
तसेच ही माहिती दडवून का ठेवली होती, अशीही विचारणा केली आहे. यावर जोकोवीचने माफी मागितली असूनही ऑस्ट्रेलियाच्या सरकारकडून त्याचा व्हिसा रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसेच व्हिसा रद्द झाला तर लगेचच त्याला देश सोडण्याची सूचनाही देण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी 14 दिवस कुठेही प्रवास केला नव्हता, अशी माहिती त्याने व्हिसासाठी सादर केलेल्या कागदपत्रांत दिली होती. मात्र, मॉन्टेकार्लो येथे राहणारा जोकोवीच दोन आठवड्यांच्या कालावधीत स्पेन आणि सर्बियामध्ये एका कार्यक्रमात उपस्थित असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाचे सरकार त्याच्यासाठी कोणतीही सवलत देण्याच्या तयारीत नसल्याने त्याचा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील सहभागही अद्याप अनिश्चित मानला जात आहे.





