Sharad Pawar : “परिस्थिती विदारक झाली आहे…”; मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांचं मोठं विधान

Sharad Pawar – सामाजिक ऐय जपणार्या महाराष्ट्रात आजची परिस्थिती विदारक झाली आहे. सामाजिक ऐक्याची वीण तुटली जात असल्याची चिंता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली. राज्यातील सामाजिक सलोखा बिघडत असताना सर्वांनी सामाजिक एकोपा राखण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले.
दिंडोरी तालुक्यातील आंबे दिंडोरी येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या स्मारकाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना दुसरीकडे ओबीसी नेतेही आक्रमक झाले आहेत. त्यामुळे, गावागावात ओबीसी आणि मराठा असा सामाजिक समतोल ढासळत चालल्याचे दिसून येत आहे. त्या अनुषंगाने शरद पवार यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राचे चित्र सध्या थोडे वेगळे झालेले आहे. समतेचा विचार हा अस्थिर होतोय का काय असे दिसत आहे. सामाजिक ऐक्याची वीण उसवली जात असल्याचे चित्र आहे. माझ्या मते महाराष्ट्रासमोर हे एक प्रकारचे आव्हान आहे.
मात्र, काय वाट्टेल ती किंमत मोजू पण सामाजिक ऐक्य जपू, महाराष्ट्र एकसंघ कसा राहिल यासाठी आणि महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मांच्या लोकांना एकत्रित कसं ठेवता येईल यासाठी व महाराष्ट्राचा लौकिक पुढे घेऊन जाण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्यासाठी तुम्ही, आम्ही आणि सर्वांनी पुढे आले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.





