Purandar : वाल्हे येथील शिवकालीन भवानी माता मंदिर उजळले
Purandar : छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी सईबाई यांना मोगलांपासून वाचवण्यास वाल्हे येथील चर्मकार समाजाने आश्रय दिल्याचा इतिहास आहे.

वाल्हे :आद्य रामायणकार महर्षि वाल्मिकींच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या वाल्हे (ता. पुरंदर) नगरीमध्ये पूर्वेकडे डोंगरावर असणाऱ्या ‘शिवकालीन’ भवानी माता मंदिरात नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. मंदिरात घटस्थापनेपासून दररोज विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
कार्यक्रमासाठी मंदिर परिसरात नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. वाल्हे येथील पंचक्रोशीतील आराध्य दैवत असलेल्या डोंगरावरील ‘शिवकालीन’ भवानी मातेचे मंदिर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुलदेवतेपैकी एक असलेल्या भवानी देवीला समर्पित आहे. मंदिराला विद्युत रोषणाई केली असून मंदिराचा जीर्णोद्धार लोकसहभागातून केला आहे. तीन वर्षांपूर्वीच दुरगुडे परिसरातील सदस्य, मंदिरांच्या शिखराच्या कामांसाठी सहकार्य करून काम पूर्णत्वास नेले आहे.
भवानीमाता डोंगर परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत आहे. देवीच्या दर्शनासाठी माहेरवासिनी महिला आवर्जून येत असतात. पाचव्या माळेपासून वाल्हे, वीर, जेजुरी, राख, परिंचे, नवलेवाडी, राऊतवाडी, माहूर, मांढर, हरणी, नीरा, पिंगोरी, आडाचीवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी फलटण, लोणंद, पुणे, सातारा जिल्ह्यातील अनेक भाविक मोठी गर्दी करीत आहेत. मंदिराची देखभाल वंशपरंपरेने मनोज भोसले, रमेश भोसले, शिवलिंग सकलावे, सतीश भोसले, देविदास भोसले, गणेश भोसले हे नित्यनेमाने करीत असतात.
छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी सईबाई यांना मोगलांपासून वाचवण्यास वाल्हे येथील चर्मकार समाजाने आश्रय दिल्याचा इतिहास आहे. त्यामुळे आठवण म्हणून त्यांनी भवानी माता मंदिर बांधले असून संपूर्ण मंदिर हेमाडपंथी आहे, अशी माहिती देवीचे पुजारी मनोज परशुराम भोसले व ऊर्मिला मनोज भोसले यांनी सांगितले.
धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
डोंगरावरील शिवकालीन भवानीमाता मंदिरास फुलांची सजावट, आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला आहे. नवरात्रोत्सवात दररोज पहाटे साडेपाचदरम्यान आरती, दोन प्रहरात देवाची पूजा, छबिन्यासह पालखीची मंदिर प्रदक्षिणा, भजन, गोंधळ आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दिवसभर देवीचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. पहाटेच्या आरतीस भावनीमाता मंदिरात मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त उपस्थित राहतात.





