ठरलं! दोन्ही गटांना निवडणूक आयोगाकडून पक्ष नावे जाहीर; जाणून घ्या कोणाला कोणतं नाव मिळालं

मुंबई – शनिवारी रात्री केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले. त्यानंतर दोन्ही गटाला सोमवारी दुपारपर्यंत पक्षासाठी नवीन नाव आणि नवीन चिन्हासाठी पर्याय देण्यास सांगितले होते. दोन्ही गटांनी तीन पक्ष नावे आणि तीन चिन्ह निवडणूक आयोगाकडे सादर केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने निर्णय दिला असून शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आणि ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळाले आहे. तसेच ठाकरे गटाला मशाल हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.
शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी या जागेवर 3 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार असून 6 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या निवडणूकीसाठी हे पक्ष नाव आणि पक्ष चिन्ह मिळाले आहेत.
दरम्यान, शिंदे गटांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची अशी तीन नावे पर्याय म्हणून आयोगाकडे दिली होती. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडूनही शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी नावे सादर करण्यात आली आहेत. ठाकरे यांच्याकडून पक्ष चिन्हासाठी त्रिशुळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल हा पर्याय देण्यात आला होता. तर शिंदे गटाकडून उगवता सूर्य, त्रिशुळ आणि गदा या चिन्हांचा पर्याय दिला होता.




