IND vs AUS 2nd T20 : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-20 सामना तिरुवनंतपुरममध्ये; जाणून घ्या…कशी असेल इथली खेळपट्टी

India vs Australia 2nd T20 Match Pitch Report : भारतीय संघाने 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 2 गडी राखून पराभव केला. अशा प्रकारे टीम इंडिया मालिकेत 1-0 ने पुढे आहे. या मालिकेतील दुसरा सामना 26 नोव्हेंबरला तिरुअनंतपुरममध्ये खेळवला जाणार आहे. विशाखापट्टणम T20 सामन्यांमध्ये खूप धावा काढल्या गेल्या. दोन्ही संघांनी 200 धावांचा टप्पा पार केला. पण तिरुवनंतपुरममध्ये फलंदाजांचे वर्चस्व राहिल की गोलंदाज आव्हानात्मक बनतील? या मैदानावर आतापर्यंत 4 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत.
ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमची आकडेवारी काय सांगते?
तिरुवनंतपुरममधील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमच्या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या होत नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. म्हणजेच फलंदाजांना मोठे फटके मारणे सोपे नाही. या खेळपट्टीवर कमी धावसंख्येचे सामने झाले आहेत. ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमच्या खेळपट्टीवर फलंदाजांना गोलंदाजांसमोर धावा काढण्यासाठी झगडावे लागते.
या मैदानावर टी-20 फॉरमॅटमध्ये सरासरी धावसंख्या केवळ 114 धावा आहेत. त्याच वेळी, तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये संघ धावांचा पाठलाग करण्यास पंसती देतात. म्हणजेच टाॅस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य दिले जाते. आतापर्यंत 2 सामन्यात धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे, तर 1 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे.
मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज…
याआधी भारतीय संघाने विशाखापट्टणम T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 2 विकेटने पराभव केला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 3 गडी गमावून 208 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 19.5 षटकांत 209 धावा करत सामना जिंकला.
भारताकडून कर्णधार सूर्यकुमार यादवने 42 चेंडूत सर्वाधिक 80 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 4 षटकार मारले. या शानदार खेळीसाठी टीम इंडियाच्या कर्णधाराला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.





