शाळेची घंटा आज वाजणार; विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा झाल्या सज्ज

नगर – दोन महिन्यांच्या उन्हाळी सुटीनंतर आज (गुरुवारी) शाळेची घंटा वाजणार आहे. शाळा सुरू होणार असल्याने पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज झाल्या आहेत. शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचारी आज दिवसभर शाळा सजविण्यात मग्न झाले होते. खासगी, अनुदानित व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आजपासून शाळा गजबजलेल्या दिसल्या.त्यादृष्टीने मुख्याध्यापक, शिक्षकांनी तयारी केली आहे. जिल्हा परिषद, तसेच अनुदानित शाळांमध्ये पहिल्याच दिवशी मोफत गणवेश, पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत शासकीय, जिल्हा परिषद, महापालिका, तसेच खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप दरवर्षी करण्यात येते. यानुसार जिल्ह्यातील 4 लाख 53 हजार 879 विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार आहेत. ही पुस्तके तालुकास्तरावरील गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापकांकडे पोहोचविण्यात आली आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली याचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात 1 लाख 857 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश जिल्ह्यातील 1 लाख 857 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, तसेच कटक मंडळाच्या शाळांमधील सर्व मुली, अनुसूचित जाती-जमातीतील मुले, तसेच दारिर्दयरेषेखालील कुटुंबातील मुले यांना शासनाकडून मोफत गणवेश दिला जातो. या गणवेशाचे पैसे शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापन समित्यांना दिले असून या समित्या गणवेश खरेदी करणार आहेत.
दरवर्षी शासनाकडूनच दोन गणवेशाचे पैसे देण्यात येतात. त्यातून स्थानिक स्तरावर शाळा व्यवस्थापन समित्या कापड खरेदी करून गणवेश घेतात. मात्र यावर्षी एक राज्य एक गणवेश या धर्तीवर थेट राज्य शासनच दोन गणवेश पुरवणार, अशी घोषणा झाली. मात्र त्याप्रमाणे अंमलबजावणी झाली नाही. शासनाने पूर्वीप्रमाणेच एका गणवेशाचे पैसे शाळांना दिले. मात्र दुसऱ्या गणवेशाचे काय? याचे उत्तर अजूनही शाळांना, तसेच पालकांना मिळालेले नाही.
शासकीय शाळा (समाजकल्याण, आदिवासी विकास, सेंट्रल स्कूल, नवोदय), स्थानिक स्वराज्य (जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, कटक मंडळ), तसेच शासन अनुदानित, अंशत: अनुदानित अशा एकूण साडेचार हजारांहून अधिक शाळांमधील साडेचार लाख विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळणार आहेत.





